बाप्पाच्या निरोपाला पोलीस सज्ज, उत्सवातील ‘भाविक’कोंडी टाळण्यासाठी ५३ रस्ते बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 04:36 AM2017-09-04T04:36:53+5:302017-09-04T04:37:51+5:30
शहरासह उपनगरात गणेशोत्सवाचे पडघम शेवटच्या टप्प्यात आले आहेत. प्रवासी सुरक्षिततेसाठी सुरक्षा यंत्रणेकडून खबरदारी घेतली जात आहे. त्याचबरोबर उत्सवकाळात ‘भाविक’कोंडी टाळण्यासाठी मुंबई वाहतूक पोलीसदेखील सज्ज झाले आहेत.
मुंबई : शहरासह उपनगरात गणेशोत्सवाचे पडघम शेवटच्या टप्प्यात आले आहेत. प्रवासी सुरक्षिततेसाठी सुरक्षा यंत्रणेकडून खबरदारी घेतली जात आहे. त्याचबरोबर उत्सवकाळात ‘भाविक’कोंडी टाळण्यासाठी मुंबई वाहतूक पोलीसदेखील सज्ज झाले आहेत. वाहतूक पोलिसांच्या वतीने शहरातील ५३ रस्ते बंद करण्यात आले आहेत. ५४ रस्त्यांवर एकेरी वाहतुकीला परवानगी असेल. ९९ ठिकाणी वाहन उभे करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. ५ सप्टेंबर (अनंत चतुर्दशी) दिवशी बाप्पाच्या निरोपासाठी वाहतूक पोलिसांचा पहारा असून हे नियम लागू करण्यात येणार आहेत.
शहरातील वाहतूक सुरळीत राखण्यासाठी वाहतूक पोलिसांचे ३ हजार ५०० अधिकारी-कर्मचारी सज्ज आहेत. त्याचबरोबर ५०० ट्रॅफिक वॉर्डनदेखील प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. वाहतुकीच्या चोख नियोजनासाठी गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क चौपाटी, वांद्रे बडी मस्जिद, जुहू चौपाटी आणि पवई येथे वाहतूक नियंत्रण कक्ष उभारला जाणार आहे.
हे मार्ग राहणार बंद-
दक्षिण मुंबईतील काळबादेवी विभागातील जगन्नाथ शंकर शेठ रोड, व्ही.पी. रोड, सी.पी. टँक रोड वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. भायखळा विभागातील भारतमाता ते बावला कंपाउंडपर्यंत मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. गोपाळ नाईक चौक ते लालबाग पोलीस चौकी, चिंचपोकळी पूल ते यशवंत चौक, काळाचौकी असा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.
वरळी विभागातील डॉ. अॅनी बेझंट रोड वरळी नाका ते हाजीअली जाणारा दक्षिण वाहिनी मार्ग बंद राहणार आहे. परिणामी डॉ. ई. मोझेस रोडवरून महालक्ष्मी रेल्वे स्थानक मार्गे वाहतूक वळविण्यात येणार आहे. त्याचबरोबर ना.म. जोशी मार्गदेखील विशिष्ट टप्प्यावर वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. दादर विभागातील एस.के. बोले रोडवर हनुमान मंदिर ते पोर्तुगीज चौकपर्यंत एकेरी वाहतुकीची मुभा असणार आहे.
विसर्जनादिवशी सकाळी ११ ते दुसºया दिवशी पहाटे ६ वाजेपर्यंत शहरातील ९९ ठिकाणी वाहने उभी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मलबार हिल विभागातील विसर्जन मार्गावरील ११ ठिकाणी वाहने उभी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. दादर चौपाटी परिसरातील केळूसकर मार्ग (मुख्य, उत्तर आणि दक्षिण), चैत्यभूमी ते शिवाजी पार्क जंक्शन आणि चौपाटी परिसरात वाहने उभी करण्यास मनाई असणार आहे.
गणेश विसर्जनाच्या दिवशी मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतूक मार्गात काही बदल केले आहेत. शहरातील ५३ रस्ते बंद करण्यात आले आहेत. त्याची माहिती देणारा हा नकाशा.