बाप्पाच्या दर्शनाला सरींची साथ!
By Admin | Published: September 2, 2014 01:21 AM2014-09-02T01:21:31+5:302014-09-02T01:21:31+5:30
महाराष्ट्रासह मुंबापुरीही गणोशोत्सवात दंग असताना बाप्पाच्या दर्शनाला गेले दोन दिवस पावसाची साथ मिळाली.
अहमदनगर: शहरासह जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे़ नुकत्याच झालेल्या पावसाने नगर शहरासह ग्रामीण भागात दाणादाण उडाल्याने चिंता व्यक्त करत महापालिकेसह जिल्हा आरोग्य, बांधकाम आणि महावितरणने तातडीने उपाययोजना करून अहवाल सादर करावेत, असे सक्त आदेश जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी सोमवारी संबंधित अधिकाऱ्यांना बजावले़ आपत्ती व्यवस्थापनाबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना कवडे यांनी केल्या आहेत़
गेल्या दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे़ या पावसामुळे दाणादाण उडाली आहे़ अनेक कुटुंब बेघर झाली़ साथीच्या रोगांनी थैमान घातले आहे़ रस्ते व पूल पाण्याखाली गेले़ त्यामुळे वाहतूक विस्कळीत होऊन काही ठिकाणी संपर्क तुटला आहे़ असे असतानाच हवामान खात्याने येत्या २४ तासांत नगर शहरासह जिल्ह्यात अतिवृष्टी होईल, अशी शक्यता असल्याचा इशारा दिला आहे़ या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कवडे यांनी महापालिका प्रशासन, जिल्हा शल्यचिकित्सक, सार्वजनिक बांधकाम खाते आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांना तातडीने उपाय योजना करण्याचे आदेश दिले आहेत़ शहर आणि ग्रामीण भागात पावसामुळे निर्माण होणाऱ्या आपत्तीवर मात करण्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांचे पथक नियुक्त करून वेळोवेळी आढावा घेण्याच्या सूचना नोटिसीव्दारे करण्यात आल्या आहेत़ तसेच याविषयी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल जिल्हा प्रशासनास सादर करण्याचेही त्यात नमूद आहे़ (प्रतिनिधी)
नगर शहरात नुकत्याच झालेल्या पावसामुळे सीना नदी परिसरात सखल भागात पाणी साचत आहे़ नालेसफाई न झाल्यामुळे शहरातील पाणी वाहून न जाता ठिकठिकाणी तुंबत आहे़ रस्ते व वसाहतींत कचऱ्यांचे ढिग साचले आहेत़ त्यामुळे साथीचे रोग पसरत आहे़ नदी, ओढे, नाले परिसरातील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे़ त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील ३० अन्वये शहरातील नदी,ओढे आणि नाल्यांचे पात्राची तातडीने सफाई करून प्रवाहातील अतिक्रमणे तात्काळ दूर करावेत़ कचऱ्याचे ढिग उचलून साथ रोग प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी़शहरात अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत़ वाहतुकीच्यादृष्टीने धोकादायक असलेले खड्डे महापालिकेने तात्काळ दुरुस्त करावे़ शहरातील पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल वाहतुकीसाठी बंद करून त्यावर मार्गदर्शक फलक लावणे, आदीं आवश्यक ती कार्यवाही करून अहवाल जिल्हा प्रशासनास सादर करावेत, अशा आशयाची नोटीस महापालिका आयुक्त विजय कुलकर्णी यांना बजावण्यात आली आहे़