मुंबई - गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या नाइटलाइफच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता येत्या 27 जानेवारीपासून मुंबईत नाइटलाइफ प्रत्यक्षात लागू होणार आहे. मात्र, राज्य सरकारच्या या नाइट लाइफच्या निर्णयाला भाजपाने विरोध दर्शविला आहे. भाजपाच्या या विरोधानंतर कामगारमंत्री नवाब मलिक यांनी विरोधकांनी अगोदर अभ्यास करावा, असे म्हणत भाजपा नेत्यांना टोला लगावला आहे.
नाइटलाइफ नाही तर किलिंग लाइफ असल्याचे सांगत भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. ही नाइटलाइफ नसून किलिंग लाइफ आहे. मुंबईतील कमला मिल येथे आग लागली होती. त्यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला. मुंबईच्या नाइटलाइफला रक्तरंजित इतिहास आहे, हे निर्णय घेणाऱ्यांना माहिती नाही का?' असा सवाल आशिष शेलार यांनी केला होता. त्यानंतर, नवाब मलिक यांनी नाईट लाईफबद्दल महत्त्वाची माहिती दिली.
मुंबईतील 24/7 नाईट लाईफचा जो प्रस्ताव आहे, त्यात फक्त हॉटेल्स, दुकाने, मॉल्स यांनाच पूर्णवेळ सुरू ठेवण्याची परवानगी असणार आहे. बार, क्लब किंवा मद्य दुकाने यांना परवानगी नसणार आहे. या निर्णयामुळे जिथे सन्नाटा असतो, अशा ठिकाणी होणाऱ्या गुन्हेगारीला आळा बसेल. निर्णयामुळे लोकांना सुविधा मिळणार असून मुंबईतील ट्रॅफिकही कमी होईल, असे कामगारमंत्री नवाब मलिक यांनी म्हटलंय. तसेच, या निर्णयामुळे रोजगारनिर्मित्ती होणार असून सरकारचा महसूलही वाढीस लागेल. त्यामुळे, विरोधकांनी विरोध करण्यापूर्वी प्रस्तावात देण्यात आलेल्या बाबींचा पूर्ण 'अभ्यास' करावा, असा टोलाही मलिक यांनी लगावला.
दरम्यान, मुंबईत नाइटलाइफला राज्य सरकारकडून तत्वत: मंजुरी देण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. 'पब आणि बारसाठी नवे नियम करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पब आणि बार हे आधीप्रमाणेच रात्री दीड वाजेपर्यंतच सुरू राहतील,' असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केले आहे.