बारमध्ये उघड झाला वकिलाचा भयंकर कट

By admin | Published: January 21, 2015 01:12 AM2015-01-21T01:12:35+5:302015-01-21T01:12:35+5:30

नवी मुंबईतल्या एका बारमध्ये दोन तरुणांमध्ये झालेल्या संभाषणाचा तपशील मजल दरमजल करत मुंबई गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाच्या कार्यालयात थडकला.

In the bar, the fate of the lawyer opened | बारमध्ये उघड झाला वकिलाचा भयंकर कट

बारमध्ये उघड झाला वकिलाचा भयंकर कट

Next

नवी मुंबईतल्या एका बारमध्ये दोन तरुणांमध्ये झालेल्या संभाषणाचा तपशील मजल दरमजल करत मुंबई गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाच्या कार्यालयात थडकला. ते ऐकून मालमत्ता कक्षाचे अधिकारी उडालेच. उरणमधला एका वकील लहान मुलींचे अपहरण करतोय. दोन मुलींचे त्याने अपहरण केले आहे. तिसरीच्या शोधात आहे... प्रकरण गंभीर आणि तितकेच गूढ असल्याने मालमत्ता कक्षाचे अधिकारी कामाला लागले. तपासांती त्यांच्या हाती जे काही लागले ते अत्यंत भयंकर होते...

रिटायर्ड झाल्यानंतर काय? पेन्शन मिळणार असेल तर थोडाफार आधार. पण पेन्शन नसेल तर काय? दिवस काढायचे कसे? या विचाराने अनेक जण कमावत्या वयातच आपल्या भविष्याची तजवीज करून ठेवतात. कोणी विविध विमा योजनांमध्ये पैसे गुंतवतात. कोण मालमत्ता किंवा सोन्यात पैसे गुंतवतात किंवा बँकेत पुंजी जमा करत राहतात. उरणमधल्या वकिलाने मात्र आपल्या वृद्धापकाळासाठी लहान मुलींचे अपहरणसत्र सुरू केले. या मुलींचे तो बापाप्रमाणे संगोपनही करू लागला. शेजाऱ्यांना वाटले मूलबाळ नाही म्हणून मुली दत्तक घेतल्या. पण वकिलाच्या मनात भलताच प्लान शिजत होता. या मुली मोठ्या झाल्यावर त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घ्यायचा आणि त्यांनी कमावलेल्या पैशांमधून आपले पुढील आयुष्य ऐय्याशीत घालवायचे. मात्र त्याचा हा डाव मुंबई गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने हाणून पाडला.
संजय भोईर असे या वकिलाचे नाव. त्याला शनिवारी मुंबई गुन्हे शाखेने उरण शहरातून अटक केली. भोईर उरणमध्ये नावाजलेला वकील. प्रॅक्टिसही ठीकठाक. पण त्याला बरेच शौक होते. डान्सबार हा त्यापैकीच एक. त्याच्यासोबत गुन्हे शाखेने त्याच्या पत्नीलाही या गुन्ह्यात अटक केली. रूबी. ती त्याची दुसरी पत्नी. संजयच्या पहिल्या पत्नीप्रमाणेच तीही बारबालाच. पहिली तीन मुलांना जन्म देऊन परागंदा झालेली. वाढत्या वयात संजयने रूबीशी लग्न केले. मात्र त्यांना अपत्य नव्हते. पन्नाशी ओलांडलेल्या संजयची प्रॉपर्टी बरीच होती. ती रूबीलाच मिळणार होती. मात्र संजयच्या मृत्यूनंतर आपल्याला आधार कोणाचा, या विचाराने तिनेच संजयला लहान मुलींच्या अपहरणाची आयडिया सुचवली. ऐय्याश संजयला ती पटली आणि त्याने कामही सुरू केले. किशोर ठाकूर या ओळखीतल्या तरुणाला त्याने गाठले. आपल्या एका मित्राला मुले नाहीत आणि दत्तक घेण्याची त्याची ऐपत नाही. रस्त्यावर राहणाऱ्यापैकी एखादी मुलगी त्याला मिळाली तर तो तिला चांगल्याप्रकारे वाढवेल, शिकवून मोठे करेल, अशी थाप मारली. किशोरने ही बाब त्याचा मित्र सलमान खान याला सांगितली. सलमानने नेरूळ परिसरातून एका चार वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण केले आणि किशोरच्या माध्यमातून तिला भोईरच्या हवाली केले. या बदल्यात त्याला एक लाख रुपये मिळाले. काही दिवसांनी किशोरने त्याला पुन्हा एका मुलीचे अपहरण करण्यास सांगितले. त्याने वाशी परिसरातून आणखी एका मुलीचे अपहरण केले. दरम्यान, काही दिवस गेले. पुन्हा किशोरने सलमानशी संपर्क साधून आणखी एका मुलीची मागणी केली.
तेव्हा मात्र सलमानचे डोके फिरले. तो वैतागला. अरे मूल नाही तर मुलगीच कशाला? मुलगा का नाही? आपण ज्या दोन मुलींचे अपहरण केले त्यांचे काय होणार, हा प्रश्न त्याला सतावू लागला. त्याच्या मनात काहूर माजले. ते शमवण्यासाठी तो नवी मुंबईतल्या एका बारमध्ये गेला. सोबत मित्र होताच. पेगवर पेग रिचवताना सलमानने आपल्या मनातले प्रश्न या मित्रासमोर मांडले. मित्राचे कुतूहल वाढले. त्याने सलमानकडून आणखी माहिती काढली. पुढे याच मित्राने नवी मुंबईतल्या काही ओळखीतल्या पोलिसांना सांगितली. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मग या मित्राने थेट मालमत्ता कक्षातील एपीआय दिलीप फुलपगारे यांना ही माहिती दिली. फुलपगारे यांनी वरिष्ठ निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांना प्रकरण सांगितले. गोपाळे यांना या माहितीत मोठी केस दडल्याचे जाणवले. त्यांनी लगेचच निरीक्षक दिनकर भोसले, एपीआय फुलपगारे, नितीन पाटील, चंद्रकांत दळवी, लक्ष्मीकांत साळुंखे आणि पथकाला मार्गदर्शन करून तपास सुरू केला.

१सलमानच्या मोबाइल नंबरवरून हैदराबाद, नागपूर, पुणे फिरून अखेर तपास उरणमध्ये थांबला. उरणमधून संजय भोईर, पत्नी रूबी, सलमान, किशोर या सर्वांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे या चौघांनी अपहरण केलेल्या दोन चिमुरड्या मुली भोईरच्या उरणच्या घरी सापडल्या.
२या तपासात रूबीचे संपूर्ण कुटुंबच वेश्याव्यवसायात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. चेंबूरला राहणाऱ्या रूबीचे ग्राहक मुंबईसह नागपूर, पुण्यात आहेत. बहिणीच्या पुण्याच्या घरातही काही मुली आढळल्या आहेत. तसेच रूबीच्या भावांकडेही मुली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. बहुधा या मुलीही अशाचप्रकारे अपहरण केलेल्या असाव्यात, असा दाट संशय पोलिसांना आहे.

जयेश शिरसाट

Web Title: In the bar, the fate of the lawyer opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.