मुंबई - काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे वर्तन शिक्षकावर छाप पाडण्यासाठी उतावीळ; पण आपल्या विषयावर प्रावीण्य मिळविण्याची अजिबात इच्छा नसलेल्या किंवा ती योग्यता नसलेल्या विद्यार्थ्याप्रमाणे आहे, असे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले आहे.ओबामा यांनी ‘ए प्रॉमिस्ड लँड’ या पुस्तकामध्ये आपल्या राजकीय व सामाजिक जीवनातील आठवणी शब्दबद्ध केल्या आहेत. ओबामांच्या या टीपण्णीनंतर देशातील काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर, खासदार संजय राऊत यांनीही ओबामांच्या ज्ञानावर प्रश्न उपस्थित केला आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावरील आठ वर्षांच्या काळात ओबामा यांना जे अनुभव आले त्याचे चित्रणही या पुस्तकात आहे. राहुल गांधी हे मला निराश वाटले असे निरीक्षण नोंदवून बराक ओबामा यांनी म्हटले आहे की, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग हे आदरणीय व अतिशय प्रामाणिक गृहस्थ आहेत. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याबद्दलच्या काही आठवणींचा उल्लेख ओबामांनी आपल्या नव्या पुस्तकात केला आहे. ओबामा यांचे पुस्तक येत्या मंगळवारी प्रसिद्ध होणार आहे.
राहुल गांधींसदर्भात बराक ओबामा यांनी नोंदवलेल्या निरीक्षणाबद्दल शिवसेनेनं नाराजी व्यक्त केली. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी बराक ओबामांना भारताबद्दल असलेल्या ज्ञानावर प्रश्न उपस्थित केला आहे. एक विदेश राजकीय रणिनीतीतज्ञ भारतीय राजकीय नेत्यांबाबत कधीही अशी टीपण्णी देऊ शकत नाही. तसेच, ओबामांच्या टीकेनंतर देशात सुरू झालेल्या राजकीय चर्चेलाही उचित नसल्याचं राऊत यांन म्हटलं. आम्ही हे नाही म्हणणार की ट्रम्प वेडे आहेत. तर, ओबामांना भारताबद्दल किती माहिती आहे? असा सवालच राऊत यांनी विचारला आहे. राऊत यांच्या या प्रश्नावर माजी खासदार आणि भाजपा नेते निलेश राणेंनी शिवसेनेची खिल्ली उडवली आहे.
निलेश राणेंनी ट्विट करुन शिवसेनेची खिल्ली उडवली आहे. ''शिवसेना हा एका राज्याचा जागतिक पक्ष नाराज झाल्यामुळे बराक ओबामाला झोप लागत नसेल. आता ओबामाचं कसं होणार, या चिंतेमध्ये त्यांचा डेमोक्रॅट पक्ष युनायटेड नेशन्सकडे धाव घेण्याच्या विचारात असावा. ओबामाचं आता काही खरं नाही.'', असे म्हणत निलेश राणेंनी खासदार संजय राऊत आणि शिवसेनेची खिल्ली उडवली आहे.