सावंतवाडी टर्मिनसला अडथळा राज्यराणीचा

By admin | Published: October 16, 2015 09:13 PM2015-10-16T21:13:24+5:302015-10-16T22:52:32+5:30

सिंधुदुर्ग : तीन वर्षापासून राजकारणात टर्मिनसचा मुद्दा कळीचा

Barathal Rajyani of Sawantwadi Terminus | सावंतवाडी टर्मिनसला अडथळा राज्यराणीचा

सावंतवाडी टर्मिनसला अडथळा राज्यराणीचा

Next

अनंत जाधव ---सावंतवाडी ‘राज्यराणी’ गाडीला नवीन ट्रॅक नसल्याने सावंतवाडी टर्मिनसच्या कामाला बे्रक लागला आहे. राज्यराणीला नवीन ठिकाणी जागा देता येत नाही, तोपर्यंत टर्मिनसचे काम पुढे सरकणार नाही. तर दुसरीकडे कोकण रेल्वे उभारत असलेली रेल हॉटेलची निविदा कोणी न भरल्याने या प्रकल्पाचे भवितव्य सध्या अधांतरी बनले आहे. हा प्रकल्प रेल्वे गुंडाळण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.गेली तीन वर्षे सिंधुदुर्गच्या राजकारणात सावंतवाडी रेल्वे टर्मिनस कळीचा मुद्दा होता. टर्मिनस कुठे करणार यावरून जुगलबंदी होती. सध्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मळगावला, तर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मडुरा येथे पसंती दिल्याने नेमके टर्मिनस कोठे करायचे, असा प्रश्न प्रशासनासमोर होता. टर्मिनस मळगाव येथे केले, तर जागेचा प्रश्न निर्माण होईल, असे तत्कालीन जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी सांगितले होते.
तसेच मडुरा येथे पुरेशी जमीन असल्याचा अहवाल त्यांनी शासनाला दिला होता. त्यामुळे टर्मिनस मडुरा येथेच होणार, अशी शक्यता होती. मात्र, टर्मिनसला ९ हेक्टर जागा पुरेशी असल्याचे सांगत दीपक केसरकर यांनी मळगाव येथेच टर्मिनस व्हावे, असा आग्रह धरला होता.
मात्र, शिवसेना-भाजपचे सरकार केंद्रात व राज्यात आल्यानंतर व सिंधुदुर्गचा सुपुत्र केंद्रीय रेल्वेमंत्री झाल्यानंतर टर्मिनस हे मळगाव येथेच होणार यावर शिक्कामोर्तब झाले होते. या टर्मिनसच्या कामाचे २७ जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात भूमिपूजनही करण्यात आले. तसेच कामालाही सुरूवात करण्यात आल्याची घोषणा केली. मात्र, प्रत्यक्षात घोषणेनंतर काही दिवस काम सुरू राहिले खरे; पण हवी तशी कामाला गती आली नाही.
टर्मिनससाठी रेल्वेमंत्र्यांनी ११ कोटीचा निधीही मंजूर केला आहे. मात्र, टर्मिनससाठी ५ रेल्वे ट्रॅक टाकायचे आहेत. ते सध्या तीन ट्रॅक टाकण्यात आले आहेत, तर उर्वरित दोन रेल्वे ट्रॅकला परवानगी देण्यात आली असून, अद्यापपर्यंत ते टाकण्यात आले नाहीत. टर्मिनस करायचे तर साधनसामग्री, कर्मचारी वर्ग यांची मोठी गरज असते. त्याशिवाय इमारतही सुसज्ज हवी. पण याची कोणतीही निविदा अद्याप काढण्यात आलेली नाही.


सावंतवाडी टर्मिनसचे काम बंद झाले नसून, ते हळूहळू सुरू आहे. सध्या टर्मिनसला राज्यराणीच्या ट्रॅकचा अडथळा असून, तो ट्रॅक लवकरात लवकर इतरत्र हलवण्यात येईल. त्यामुळे इतरत्र हलविण्यात आलेल्या ट्रॅकवर राज्यराणी उभी राहील व टर्मिनसचे काम सुरू होईल. हा प्रकल्प गुंडाळला जाणार नाही. मात्र, काम संथ गतीने सुरू आहे.
- डी. निकम
रेल्वे रिजनल मॅनेजर


रेल हॉटेलचा प्रकल्प गुंडाळणार?
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे टर्मिनसबरोबरच मळगाव रेल्वे स्थानकात रेल हॉटेलचा बहुउद्देशीय प्रकल्प ‘बांधा, वापरा, हस्तांतर करा’ या तत्वावर चालवण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी काही दिवसांपूर्वी निविदाही काढण्यात आली होती. शंभर रूमच्या या हॉटेल प्रकल्पासाठी कोणीही निविदा भरलेली नाही.

Web Title: Barathal Rajyani of Sawantwadi Terminus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.