मुंबई : बारबालेच्या बर्थडे सेलीब्रेशनसाठी अंधेरीच्या ‘वुई व्हीआयपी’ क्लबमध्ये केलेला गोळीबार व्यावसायिकाच्या मुलाला भलताच महागात पडला आहे. या प्रकरणी अंबोली पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक दया नायक आणि त्यांच्या पथकाने एकूण १२ जणांना अटक केली आहे, तर पसार आरोपींचा शोध अंबोली पोलीस घेत आहेत.अंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या ‘वुई व्हीआयपी’ क्लबमध्ये व्यावसायिकपुत्र राकेश कालरा (४०) हा त्याची बारबाला असलेली मैत्रीण निशाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आला होता. कालरा हा एका कपडे व्यावसायिकाचा मुलगा असल्याचे वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले. सुरुवातीला त्यांना क्लबमध्ये शस्त्र घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली. मात्र पार्टीचे बिल पाच लाखांपर्यंत करण्याचे आमिष दाखवून त्याने क्लबमध्ये प्रवेश मिळवला.निशा ही मालाडच्या चिंचोली बंदर परिसरातील जशन बारमध्ये काम करते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. कालरासोबत त्या वेळी मुंबईतील अनेक लेडीज बारचा मालक असलेला मितेश जाधव आणि अन्य साथीदार होते. वाढदिवसाच्या सेलीब्रेशनदरम्यान निशाला इम्प्रेस करण्यासाठी बारमध्ये गोळीबार करण्यात आला. मात्र याची माहिती क्लब प्रशासनाने पोलिसांना दिली नाही.अंबोली पोलीस ठाण्याचे सपोनि करमळकर यांना काही पत्रकारांकडून या गोळीबाराची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी ही बाब अंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत गायकवाड यांना सांगितली.दोन काळ्या रंगाच्या १२ बोअर पंप अॅक्शन पाइपगन, ०.३२ बोअरची पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे, दोन दुर्बीण असलेल्या रायफल, रिकामी पुंगळी, गोळीबार झालेल्या बुलेटसारखे दिसणारे तांब्याचे तुकडे हे सर्व दया नायक आणि त्यांच्या पथकाने वाकोलामध्ये फॉर्च्युनर, मर्सिडीज गाडी थांबवून त्यातून हस्तगत केले.ही शस्त्रे त्यांनी का आणली होती याची चौकशी नायक यांनी केली. याबाबत समाधानकारक उत्तर न मिळाल्याने तसेच यातील एकाही शस्त्राचा परवाना त्यांच्याकडे नसल्याने कालरासह, मोहित बटला, सोनू सरोहा, महेंद्र मलीक आणि साहिल धमेजा यांचा गाशा गुंडाळण्यात आला.यातील कालराचा बॉडीगार्ड असलेल्या मलिकने गोळीबार केल्याचे तपास अधिकाºयांचे म्हणणे आहे.तर अभय वाघमारे, प्रेयस ठक्कर, कृष्णा शेट्टी, निखिल ठक्कर, कृष्णदत्त पांडे, अशोक सिंग आणि इंद्रनारायण पांडे या क्लबच्या कर्मचाºयांनादेखील अटक करण्यात आली आहे.तर कुणाल पटेल, मेहुल विटलानी, मितेश जाधव आणि क्लबमधील काही कर्मचारी सध्या पसार असून त्यांचा शोध सुरूआहे.कधी झाला गोळीबार?गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अंबोली पोलिसांनी तपास सुरू करत संबंधित क्लबमध्ये जाऊन विचारणा केली. तेव्हा गोळीबार झाल्याची कल्पनाच नसल्याचे क्लब प्रशासनाने सुरुवातीला पोलिसांना सांगितले.मात्र पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्यांनी गोळीबार केल्याची कबुली दिली. तसेच यात कोणीही जखमी नसून याबाबत आम्ही कोणालाही माहिती दिली नसल्याची सारवासारव करण्याचादेखील प्रकार घडला. मात्र अखेर क्लबच्या सुरक्षारक्षकाने गोळीबार झालेली जागा पोलिसांना दाखवली.त्या ठिकाणी बुलेटमुळे छिद्र तयार झालेले प्लाय पोलिसांना सापडले. मात्र त्या बुलेटची रिकामी पुंगळी गायब होती. बुलेट लागल्याने नुकसान झालेला एक सोफादेखील क्लब व्यवस्थापनाने बदलल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ज्यावरून पुरावे मिटवण्याचा प्रयत्न त्यांनी केल्याचे उघड झाले.
बारबालेच्या वाढदिवशी केलेला गोळीबार ‘त्यांना’ पडला महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 2:48 AM