- रेश्मा शिवडेकर मुंबई : अत्यंत दुर्मिळ आणि तितकाच घातक असा न्यूक्लिअर सोर्स (आण्विक स्रोत) मुंबईच्या पोटात निद्रिस्त अवस्थेत आहे. हा न्यूक्लिअर सोर्स हलविण्यासाठी बीएआरसीने शास्त्रशुद्ध पद्धत राबविण्यास मान्यता दिली आहे. फोर्ट येथील ‘इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’च्या १९२० पासून (ब्रिटिश काळातील रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स) कार्यरत असलेल्या शिक्षण संस्थेच्या न्यूक्लिअर केमिस्ट्री प्रयोगशाळेच्या तळघरात ‘कॅलिफोर्निअम २५२’ नावाचा स्त्रोत वर्षानुवर्षे बंदिस्त आहे.
हा सोर्स सुप्तावस्थेत आहे. परंतु, २००५ साली संस्थेच्या न्यूक्लिअर केमिस्ट्रीच्या प्रयोगशाळेचे काम थंडावल्यानंतर एकाही कर्मचारी अथवा संशोधक-प्राध्यापक वा विद्यार्थ्यांनी हा सोर्स पाहिलेला नाही. मधल्या काळात या ठिकाणी प्लुटोनिअम बेरिलिअम नावाचा आणखी एक न्यूक्लिअर सोर्स संशोधनासाठी आयात केला गेल्याचे संस्थेचे माजी प्राध्यापक डॉ. अरुण सावंत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. संशोधन करताना बीएआरसीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे लागत असे. बीएआरसीकडूनच आलेले १८ लेअरचे सुरक्षा सूट घालून आम्ही प्रयोगशाळेत काम करत होतो, असेही सावंत म्हणाले.
असा ठरू शकतो घातक? कॅलिफोर्निअम सुप्तावस्थेत असला तरी त्याचा माती, पाण्याशी संपर्क आल्यास मातीमध्ये शोषले गेलेले किरणोत्सर्गी पदार्थ मातीतील जीवजंतूंवर परिणाम करू शकतात. पाण्याशी संपर्क आल्यास कर्करोगाचा धोका संभवू शकतो. ही संस्था समुद्राजवळ आहे. या आण्विक स्त्रोताचा समुद्राच्या पाण्याशी संपर्क आला, तर समुद्री जीवनावर दुष्परिणाम होऊ शकतो.
मुंबईबाहेर न्यायचे कसे? हा न्यूक्लिअर सोर्स सुप्तावस्थेत असला तरी तो हाताळण्याची काही आंतरराष्ट्रीय मानके आहेत. तसेच, केवळ बीएआरसीलाच त्याचे अधिकार आहेत. म्हणून संस्थेने बीएआरसीशी दोनवेळा पत्रव्यवहार करून हा सोर्स हलविण्याची मागणी केली. त्याला प्रतिसाद मिळाला असून लवकरच ही प्रक्रिया सुरू केली जाईल, असे ‘होमी भाभा राज्य विद्यापीठा’चे कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
२००५ साली विभाग बंद ! बी. सी. हलदर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची न्यूक्लिअर केमिस्ट्रीची प्रयोगशाळा १९६८ साली अस्तित्वात आली. त्यानंतर के. सी. महिंद्र एज्युकेशन ट्रस्टकडून १९७४ साली मिळालेल्या तीन लाख २५ हजारांच्या देणगीतून विभागाचा विस्तार केला. नंतर तो निधी बंद झाला व २००५ साली विभागही बंद पडला.
बीएआरसीने दिला होता निर्वाळा - या दोन्ही सोर्सच्या अस्तित्वामुळे प्रयोगशाळेच्या आसपास फिरकायलाही लोक दचकतात. बीएआरसीचे शास्त्रज्ञ, ठराविक कालावधीत येऊन पाहणी करतात.- २०११ आणि २०१८ साली बीएआरसीने या सोर्सची पाहणी करून तो सुप्तावस्थेत असल्याचा निर्वाळा दिला. - आता इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सला समूह विद्यापीठाचा (क्लस्टर) दर्जा मिळाल्यानंतर विस्तारासाठी नवीन इमारतीची आवश्यकता आहे. - बंद झालेल्या न्यूक्लिअर केमिस्ट्री प्रयोगशाळेची इमारत बांधून नवी पाच मजली इमारत बांधण्याची योजना आहे. त्यासाठी राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने संस्थेला ३६ कोटी ५६ लाख रुपये मंजूर केले आहेत. - प्रयोगशाळेची इमारत पाडण्यापूर्वी हा न्यूक्लिअर सोर्स हलविणे आवश्यक आहे. तसा तो हलविला जाईल.
हलदर यांचे प्रयत्नएखाद्या संलग्नित महाविद्यालयाला न्यूक्लिअर सोर्स संशोधनासाठी मिळणे हीच मुळात दुर्मीळ गोष्ट. संस्थेचे तत्कालीन संचालक आणि न्यूक्लिअर केमिस्ट्रीतील प्रख्यात संशोधक बी. सी. हलदर यांच्या प्रयत्नांमुळे हा सोर्स बीएआरसीकडून संस्थेला मिळाल्याचे विभागाचे माजी प्रमुख नरेंद्र ठक्कर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. हलदर यांच्यानंतर आर. ए. नाडकर्णी, डॉ. बी. एम. तेजम, झेड. आर. तुरेल, डॉ. हेमलता बागला आदींनी येथील न्यूक्लिअर केमिस्ट्री प्रयोगशाळेत संशोधन करत हलदर यांची परंपरा जपली. सुमारे ४० विद्यार्थ्यांनी या न्यूक्लिअर सोर्सचा त्यांच्या संशोधनासाठी आधार घेतला आहे.