Join us

बर्धमान रेल्वे स्थानकाचे नाव बदलणार नाही - रेल्वेमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 2:43 AM

अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली जैन समाजाचे एक शिष्टमंडळ शुक्रवारी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना भेटले

मुंंबई : जैन धर्मीयांचे २४ वे तीर्थकर भगवान महावीर स्वामी यांच्या नावाने पश्चिम बंगालमध्ये कोलकात्यापासून १०० किमी अंतरावर असलेले ‘बर्धमान रेल्वे स्थानका’चे नाव बदलण्यात येणार नाही, असे आश्वासन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांना दिले.

अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली जैन समाजाचे एक शिष्टमंडळ शुक्रवारी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना भेटले. या वेळी जैन समाजाच्या भावनांचा आदर करून बर्धमान रेल्वे स्थानकाचे नामांतर करण्यात येणार नाही, असे आश्वासन रेल्वेमंत्र्यांनी दिले. या वेळी महासंघाचे महामंत्री संदीप भंडारी, शिष्टमंडळामध्ये दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष जे. के. जैन, राज रिषी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मागील काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमामध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी बर्धमान रेल्वे स्थानकाचे नाव बदलून त्याचे ‘क्रांतिकारी बटुकेश्वर दत्त रेल्वे स्थानक’ असे नामांतर करण्यात येईल, असे जाहीर केले होते. ही बाब जैन समाजाला समजताच त्यांच्याकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

पश्चिम बंगालमधील बर्धमान या ठिकाणी भगवान महावीर स्वामींनी विचरन केले होते. महावीर स्वामींना ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांचा पहिला चतुर्मास या भागामध्ये झाल्याचा उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो. या ऐतिहासिक महत्त्वामुळे मुगल काळापासून या जिल्ह्यात ‘बर्धमान’ असे नाव प्रचलित झाले आहे.