मुंबई : हवामान विभागाकडून धोक्याची सूचना मिळाल्यानंतरही तौक्ते चक्रीवादळ जास्त वेळ राहणार नाही, ते आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही, या भ्रमात, कॅप्टन राकेश बल्लवने बार्ज पी-३०५ ला सुरक्षितस्थळी हलविले नाही. शिवाय आपत्कालीन परिस्थितीत डिस्ट्रेस सिग्नल देणे आवश्यक होते. परंतु त्यावेळी त्यांनी डिस्ट्रेस सिग्नल दिला नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांचा बळी गेला. अन्यथा दुर्घटना टळली असती, असे अभियंता रेहमान शेख यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात नमूद केले आहे.यलोगेट पोलिसांनी शेख यांच्या तक्रारीवरून कॅप्टनविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शेख यांच्या तक्रारीनुसार, बार्ज एकूण ८ अँकर खोल समुद्रात टाकून ओएनजीसी प्लॅटफॉर्म शेजारी उभे केले होते. वादळास बाजपर्यंत पोहोचण्यास वेळ लागणार होता. तसेच हे वादळ जास्तकाळ थांबणार नसल्याने कॅप्टन राकेश बल्लव यांनी त्यांच्या वरिष्ठांशी संपर्क साधला. जहाज सुरक्षितस्थळी न हलविता त्याच ठिकाणी थांबविण्याच्या सूचना त्यांनी केल्या. धोक्याची परिस्थिती आल्यास नोवे नावाची टग बोट सुरक्षितस्थळी हलविण्याकरिता ५ नाँटीकल मैलाच्या दरम्यान होती, असेही सांगण्यात आले.दरम्यान साेमवारी पहाटे २ च्या सुमारास एकूण ८ अँकर्सपैकी वेगवान वाऱ्याचा ताण सहन न झाल्याने एस ३, एस ४ या अशा दोन अँकरच्या केबल तुटल्याने अँकर बार्जपासून वेगळे झाले. धोक्याची परिस्थिती निर्माण झाली. बार्ज ६ अँकरवर होते. त्यावेळी कॅप्टन राकेश बल्लव यांनी नोवे टग बोटीला मदतीसाठी येण्याचा संदेश दिला. परंतु ते १६ नाँटीकल मैलावर असल्याचे समजले. त्या दरम्यान कॅप्टनने आपत्कालीन परिस्थितीत डिस्ट्रेस सिग्नल देणे आवश्यक होते. परंतु त्यांनी ताे दिला नाही. पुढे सगळे अँकर तुटले व कर्मचाऱ्यांचा बळी गेल्याचा आरोप शेख यांनी केला. दरम्यान, आयएनएस मकरने पी - ३०५ व वरप्रदा या तराफ्याचा समुद्र तळाशी शोध घेण्यात यश मिळवले. बार्ज सुरक्षितस्थळी हलविला नाहीसंकट समाेर आवासून उभे असताना आणि त्याबाबत पूर्वसूचना मिळाली असतानाही कॅप्टन राकेश बल्लव यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. बार्ज सुरक्षितस्थळी हलवला नाही. शिवाय, आपत्कालीन परिस्थितीत डिस्ट्रेस सिग्नल देणे आवश्यक असतानाही परंतु त्यावेळी त्यांनी डिस्ट्रेस सिग्नल दिला नाही. त्यांनी प्रसंगावधान राखले असते तर अनेकांचे जीव वाचले असते, अशी खंत अभियंता शेख यांनी व्यक्त केली.अशी घडली दुर्घटनापी - ३०५ हा एक निवासी बार्ज होता. तेल उत्खनन करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या राहण्याची सोय या तराफ्यावर करण्यात आली होती. ११ मे राेजी संध्याकाळीच तोक्ते चक्रीवादळाच्या संकटाचा इशारा हवामान विभागाने दिला हाेता. अरबी समुद्रात या चक्रीवादळाचा धोका असल्याचेही स्पष्ट केले आणि १५ मेपर्यंत समुद्रातल्या बोटींनी किनाऱ्यावर यावे अशी सूचनाही केली हाेती.हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतरही पी - ३०५ हे बार्ज समुद्रातच होते आणि बॉम्बे हाय तेलक्षेत्राजवळ एका प्लॅटफॉर्मला (ऑईल रिग) बांधून ठेवण्यात आले होते. त्यामुळे पूर्वकल्पना असूनही वेळेत तराफा सुरक्षित ठिकाणी न हलवल्याने साेमवारी १७ मे राेजी ही दुर्घटना घडल्याचा ठपका ठेवण्यात आला.४३ मृतदेहांची ओळख पटलीमुंबई : चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे घडलेल्या ओएनजीसीच्या बार्ज पी - ३०५ दुर्घटनेत आतापर्यंत ६१ मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. त्यापैकी ४३ मृतदेहांची ओळख पटली असून, ४१ मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. १८ मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, सर्वांचे डीएनए नमुनेही घेण्यात येत असल्याचे पोलीस प्रवक्ते चैतन्या एस. यांनी सांगितले.बार्जवरील मुख्य अभियंता रेहमान शेख यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शुक्रवारी या दुर्घटनेप्रकरणी कॅप्टन राकेश बल्लावसह अन्य आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत ६१ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी यलोगेट पोलीस अधिक तपास करत आहेत.राज्य सरकार बड्यांना वाचवतेय - शेलारमुंबई : ओएनजीसीच्या एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंत्राटदार कंपनीच्या हव्यासापोटी चक्रीवादळात बार्जची दुर्घटना होऊन अनेकांचे जीव गेले. कंपनीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. पण राज्य शासन, पोलीस हे या कंपनीच्या बड्या लोकांना वाचवत आहे, असा आरोप भाजपचे नेते आ. आशिष शेलार यांनी शनिवारी पत्र परिषदेत केला.या दुर्घटनेसंदर्भात अ. भा. नाविक संघाच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळामध्ये अखिल भारतीय नाविक संघटनेचे अध्यक्ष सुहास माटे, कार्याध्यक्ष अमोल जाधव, सरचिटणीस दीनानाथ जगाडे, उपाध्यक्ष जितेंद्र राऊत, राकेश चव्हाण होते. त्यानंतर शेलार यांनी पत्र परिषदेत आराेप केला की, दुर्घटनेला केवळ कॅप्टनलाच कसे जबाबदार धरता येईल? बार्जची कंत्राटदार कंपनी या घटनेला सर्वस्वी जबाबदार आहे.यांना वाचवताहेत पोलीसकंत्राटदार एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे मालक शहापूरजी पालनजी तसेच संचालक प्रेम शिवम, अश्विनी कुमार आणि पै यांचा राज्य शासन आणि पोलीस बचाव करीत आहेत, असा आरोप शेलार यांनी केला.
...तर दुर्घटना टळली असती! कॅप्टनच्या निष्काळजीपणामुळे कर्मचाऱ्यांचा बळी, अभियंत्याचा पाेलिसांना जबाब
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 10:14 AM