Join us

तराफा दुर्घटना: मुख्यमंत्री संवेदनशील, त्यांनी न्याय द्यावा; कंपनीला पाठीशी घालू नये- आशिष शेलार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 12:30 PM

बार्ज दुर्घटनेप्रकरणी भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकासआघाडी सरकारच्या भूमिकेवर टीका केली आहे.

बार्ज दुर्घटनेप्रकरणी भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकासआघाडी सरकारच्या भूमिकेवर टीका केली आहे. अॅफकॉनच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी करत त्यांनी मुख्यमंत्री संवेदनशील असल्यामुळं त्यांनी जनतेला न्याय द्यावा असा आर्जवी सूर शेलार यांनी आळवला आहे.

तौत्के चक्रीवादळात अरबी समुद्रात ओएनजीसी कंपनीच्या तराफा P-305ला अपघात झाला. यात तराफ्यावरील एकूण ४९ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. यापैकी २४ मृतदेहांची ओळख पटली असून, उर्वरित मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. दुर्घटनेप्रकरणी कॅप्टन राकेश बल्लावसह अन्य आरोपींविरुद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. सरकारच्या याच भूमिकेवरुन शेलार यांनी टीकास्त्र सोडलं आहे. 

तराफा दुर्घटनेसाठी एकट्या कॅप्टनलाच का जबाबदार धरलं जातंय? असा सवाल उपस्थित करत शेलार यांनी अॅफकॉन कंपनीला वाचविण्याचा घाट घालण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संवेदनशील आहेत. त्यांनी याप्रकरणी जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी देखील शेलार यांनी यावेळी केली आहे. 

दरम्यान, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी तराफा दुर्घटनेवरुन केंद्र सरकारला धारेवर धरलं. "एवढं मोठं वादळ येणार होतं हे अख्ख्या देशाला माहित होतं. देशाचे गृहमंत्री वादळाबाबत राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत होते. मग वादळाची माहिती ओएनजीसीला माहित नव्हती का? संपूर्ण घटनेला ओएनजीसी कंपनी जबाबदार आहे. कंपनीच्या सीएमडी आणि डायरेक्टवर गुन्हा दाखल व्हायला हवा", असं संजय राऊत म्हणाले.  

टॅग्स :आशीष शेलारभाजपातौत्के चक्रीवादळ