मुंबई : जुगारासाठी पैसे नाकारणाऱ्या आईच्या हत्येची सुपारी पोटच्या पोरानेच दिल्याचा खळबळजनक प्रकार बोरीवलीत सोमवारी उघडकीस आला. या प्रकरणी या मुलासह दोघांना पोलिसांनी अटक केली.धैर्य छेडा असे या मुलाचे नाव आहे. छेडा बोरीवलीच्या धरना माली चाळ क्रमांक १३मध्ये राहतो. रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास त्याची आई मीना छेडा या रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे शेजाऱ्यांनी पाहिले. त्यानंतर याबाबत बोरीवली पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मीना यांना शताब्दी रुग्णालयात दाखल केले. चौकशीदरम्यान पोलिसांनी जबराज डेविड नाडर या धैर्यच्या मित्राला ताब्यात घेतले. जबराजने पोलीस जबाबात धैर्यनेच आईच्या हत्येसाठी ५० हजार रुपयांची सुपारी दिल्याची कबुली दिली. त्यासाठी त्याने त्याला २० हजार रुपये दिल्याचेही सांगितले. वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या धैर्यचे आईसोबत पटत नव्हते. धैर्यला दारू आणि जुगाराचे व्यसन लागले होते. त्यामुळे त्याच्या आईने त्याला पैसे देणे बंद केले. याचा राग त्याच्या मनात होता. रविवारी त्याने जबराजला घरी बोलावले. तेव्हा मीना स्वयंपाकघरात पाणी भरत होत्या. तेव्हा किचनमधील चाकूने त्याने मीना यांच्या मानेवर सपासप वार केले. मीना यांना मारून त्यांच्या पॉलिसीचे दोन लाख चाळीस हजार रुपये लाटायचाही त्यांचा प्लॅन होता. या दोघांनाही अटक करून स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना २० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (प्रतिनिधी)
बोरीवलीत आईच्याच हत्येची सुपारी!
By admin | Published: April 19, 2017 3:17 AM