बार आॅर्केस्ट्रांचा डान्सबारला विरोध
By Admin | Published: October 16, 2015 03:24 AM2015-10-16T03:24:43+5:302015-10-16T03:24:43+5:30
सर्वोच्च न्यायालयाने ७५ हजार बार गर्ल्सचा विचार करून डान्सबार पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र त्यामुळे बारमधील आॅर्केस्ट्रा कलावंतांच्या रोजगारावर गदा येणार असल्याने
चेतन ननावरे, मुंबई
सर्वोच्च न्यायालयाने ७५ हजार बार गर्ल्सचा विचार करून डान्सबार पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र त्यामुळे बारमधील आॅर्केस्ट्रा कलावंतांच्या रोजगारावर गदा येणार असल्याने आॅर्केस्ट्रा आर्टिस्ट असोसिएशनने डान्सबारवरील बंदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायम राखण्याची मागणी केली आहे.
समाजाने नाकारलेल्या घटकाला पुन्हा जिवंत करण्यात काय अर्थ आहे, असा सवाल असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी विचारला आहे. जाधव म्हणाले की, बारबालांमुळे कलावंतांचे आधीच नुकसान झाले आहे. कलेच्या नावाखाली अश्लीलता पसरवणाऱ्या या घटकांवर बंदी लादणेच योग्य आहे. या उलट बारमधील आॅर्केस्ट्रामुळे सिनेसृष्टीला अनेक नामवंत अभिनेते, गायक, गायिका आणि वादक मिळाले आहेत. त्यामुळे बारमध्ये केवळ आॅर्केस्ट्राला परवानगी देत डान्सवरील बंदी कायम राखण्याची मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, प्रत्येक बारमध्ये आॅर्केस्ट्राचे किमान आठ कलाकार अपेक्षित आहेत. त्यामध्ये चार गायक आणि चार वादकांचा समावेश आहे. मात्र चार गायकांऐवजी अनेक हॉटेल व बार मालक डान्स करणाऱ्या बारगर्लचा समावेश करत आहेत. कलाकारांना देण्यात येणारे ओळखपत्र त्यांच्याकडे नसते. म्हणून हॉटेल मालक स्वत: तयार केलेली ओळखपत्रे त्यांना देत आहेत. त्यामुळे पोलिसांचीही दिशाभूल होते. परिणामी अशा हॉटेलवरही पोलिसांनी कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आदेश द्यावे, अशी मागणी जाधव यांनी
केली आहे.