मुंबई :मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणखी बळकट करण्यासाठी मेट्रोचे जाळे विणण्यात येत आहे. मेट्रो ३ च्या मार्गिकेच्या कामांसाठी लावलेले बॅरिकेड्स आता हटवल्याने रस्ते पुन्हा पूर्ववत होऊ लागले आहेत. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) कफ परेड येथील कॅप्टन प्रकाश पेठे रस्त्यावरील ४०० मीटर लांबीचा रस्ता नुकताच वाहतुकीसाठी खुला केला आहे. त्यामुळे मेट्रो कामासाठी मुंबईत अडवलेले १६.८८ किलोमीटर लांबीचे रस्ते आता मोकळे झाले आहेत. त्यामुळे या भागांत वाहनांचा प्रवास सुखकर होणार आहे.
कुलाबा ते सीप्झ मेट्रो - ३ या भुयारी प्रकल्पाच्या ३३ किलोमीटर लांबीच्या मार्गिकेच्या कामाला २०१६ मध्ये सुरुवात झाली. या मेट्रो मार्गिकेवर एकूण २७ स्थानके आहेत. ‘एमएमआरसी’च्या तेव्हाच्या नियोजनानुसार या मेट्रो मार्गिकेचा सीप्झ ते बीकेसी हा पहिला टप्पा जून २०२१ पर्यंत, तर कफ परेड ते बीकेसी हा दुसरा टप्पा जानेवारी २०२२ पर्यंत सुरू केला जाणार होता. मात्र, विविध कारणांनी हा प्रकल्प रेंगाळला.
दरम्यान मेट्रो मार्गिकेच्या कामासाठी मुंबईतील मुख्य रस्त्यांवर जागोजागी खोदकाम करण्यात आले होते, तसेच रस्ते बॅरिकेड लावून अडविण्यात आले होते. मात्र, मेट्रो मार्गिकेच्या कामाला विलंब झाल्याने बॅरिकेड्समुळे अरुंद झालेले रस्ते पूर्ववत होऊ शकले नाहीत. परिणामी, ठिकठिकाणी वाहतूक कोंडीला प्रवाशांना सामोरे जावे लागत होते, तसेच १० ते २० मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी तासभर कोंडीत अडकून पडावे लागत होते. त्यामुळे ‘एमएमआरसी’ला टीकेलाही सामारे जावे लागले होते. मात्र, आता मेट्रो मार्गिकेच्या कामाने गती पकडली असून लवकरच या मार्गिकेचा पहिला टप्पा ऑगस्टमध्ये वाहतुकीसाठी सुरू होण्याची चिन्हे आहेत. मेट्रो मार्गिकेचे काम आता पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याने रस्तेही मोकळा श्वास घेऊ लागले आहेत.
बॅरिकेड्स हटवलेले रस्ते-
१) कॅप्टन प्रकाश पेठे रोड, कफ परे- ४०० मीटर
२) गोखले रोड, दादर- ३०० मीटर
३) डी. एन. रोड, हुतात्मा चौक- ३९० मीटर
४) विधान भवन- ७६१ मीटर
५) चर्चगेट-२४० मीटर
६) मुंबई सेंट्रल-३८० मीटर
७) महालक्ष्मी-४०५ मीटर
८) सिद्धिविनायक-९७० मीटर
९) शितळा देवी-११७० मीटर
१०) धारावी- १७३० मीटर
मागील काही महिन्यांत माहीममधील शितळादेवी, वरळीतील सायन्स म्युझियम, फोर्ट परिसरातील बॅरिकेड्स हटवून रस्ते वाहतुकीसाठी पूर्ववत केले होते, तर गेल्या आठवड्यात दादर येथील ३०० मीटर लांबीचा रस्ता पूर्ववत करण्यात आला होता.
आता कफ परेड भागातील रस्ताही पूर्ववत केल्याने या भागातील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. ‘एमएमआरसी’ने पावसाळ्यापूर्वी हे रस्ते पूर्ववत करून मुंबईकरांना दिलासा दिला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटका होणार आहे.