प्रेमी युगलांना आळा घालण्यासाठी बॅरिकेट्सचा उतारा ५ हजार नागरिकांना होणार फायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 06:29 PM2020-10-16T18:29:51+5:302020-10-16T18:30:07+5:30
Barricades will benefit : नव्याने तयार केलेल्या डांबरी रस्त्यावर प्रेमी युगलांचा आणि अनधिकृत पार्किंगचा त्रास
मनोहर कुंभेजकर
मुंबई : न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीतील असलेल्या व अलीकडेच नव्याने तयार केलेल्या डांबरी रस्त्यावर प्रेमी युगलांचा आणि अनधिकृत पार्किंगचा त्रास येथील नागरिकांना होत आहे. यावर उतारा म्हणून येथील वसाहतीत बॅरिकेट्स लावण्याचे काम प्रगती पथावर आहे.याचा फायदा येथील इमारत क्रमांक 17 ते 24 व म्हाडा रो हाऊस येथील सुमारे ५ हजार नागरिकांना होणार आहे. येत्या दसऱ्याला या योजनेचा शुभारंभ होणार आहे. यामुळे येथील रस्त्यावरील प्रेमी युगलांचा आणि अनधिकृत पार्किंगच्या त्रासातून नागरिकांची मुक्तता होणार असून येथील परिसराची सुरक्षा अबाधित राहणार आहे. या संकल्पनेचे येथील नागरिकांनी स्वागत केले आहे.
या त्रासाच्या विरोधात न्यू दिंडोशी म्हाडा असोसिएशन( नियोजित) यांनी याची कल्पना स्थानिक खासदार गजानन कीर्तिकर,दिंडोशीचे आमदार सुनील प्रभू,प्रभाग क्रमांक 41चे स्थानिक नगरसेवक तुळशीराम शिंदे व दिंडोशी पोलिसांना दिली होती. त्याअनुषंगाने खासदार कीर्तिकर व आमदार प्रभू यांच्या सूचनेनुसार नगरसेवक तुळशीराम शिंदे यांनी येथील म्हाडा कॉम्प्लेक्स मधील इमारत क्रमांक 17 च्या सुरवातीला व इमारत क्रमांक 21 व 24 च्या मधील रस्त्यावर सुरक्षा दांडा (बॅरिकेट्स) बसवण्याचा निर्णय घेतला आणि आता सदर काम पूर्ण झाले आहे. तसेच याठिकाणी दोन्ही बाजूस सुरक्षा रक्षक तैनात केले जाणार आहे. सदर असोसिएशनचे निमंत्रक चंद्रमोहन होळंबे,नेताजी देसाई आणि रंजन मयेकर यांनी येथील प्रत्येक रहिवाशांच्या घरात एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.