Join us

दीनानाथ नाट्यगृहात अडथळ्यांचा ‘प्रयोग’; गाड्यांना पुस्तक विक्रीच्या शेडचा अडथळा

By संजय घावरे | Published: August 19, 2023 12:58 PM

मुंबई पालिकेच्या दीनानाथ नाट्यगृह मागील बऱ्याच दिवसांपासून विविध समस्यांच्या विळख्यात अडकले आहे.

संजय घावरे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : २०२१ मध्ये दीड कोटी रुपये खर्च करूनही अद्याप दीनानाथ नाट्यगृहातील समस्या संपलेल्या नाहीत. नाट्यगृहातील पुरुष स्वच्छतागृह महिन्याभरापासून बंद असल्याचा त्रास प्रेक्षकांना होत आहे. नाट्यगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ पुस्तक विक्रीसाठी उभारलेली पत्र्याची शेड नाटकांच्या सेटच्या बस तसेच कलाकारांच्या गाड्यांसाठी अडथळा ठरत आहेत. भविष्यात ती तुटल्यास कोणताही निर्माता जबाबदार राहणार नसल्याचा इशारा निर्माता संघाकडून देण्यात आला आहे.

मुंबई पालिकेच्या दीनानाथ नाट्यगृह मागील बऱ्याच दिवसांपासून विविध समस्यांच्या विळख्यात अडकले आहे. पहिल्या मजल्यावरील पुरुष स्वच्छतागृह दुरुस्तीच्या कामासाठी महिन्याभरापासून बंद आहे. यामुळे पुरुषांना दुसऱ्या मजल्यावर जावे लागते. वयोवृद्ध नागरिक आणि दिव्यांगाना याचा खूप त्रास होतो. आठवड्याभरात होणाऱ्या दुरुस्तीचे काम महिना संपला तरी पूर्ण न झाल्याने प्रेक्षक संतापले आहेत. याचा परिणाम तिकीट बुकिंगवर होत असल्याचे नाट्यनिर्मात्यांचे म्हणणे आहे. 

२०२१ मध्ये पालिकेच्या बिल्डिंग डिपार्टमेंटने नाट्यगृहाची डागडुजी केली. यात गच्ची व स्वच्छतागृहाच्या वॉटरप्रूफिंगसह ग्रीनरूमचे नूतनीकरण केले. यासाठी दीड कोटी खर्च करूनही अवघ्या दीड वर्षात स्वच्छतागृह पुन्हा गळू लागल्याने तोडावे लागले. त्यामुळे या कामात कुठेतरी पाणी मुरत असल्याचा संशय निर्मात्यांकडून व्यक्त होत आहे.

दीनानाथच्या मुख्य प्रवेशद्वारावर पुस्तक विक्री केंद्र सुरू केले आहे. त्याला आमची कसलीही हरकत नाही; पण नाटकाचे सेट घेऊन येणाऱ्या बस तसेच टेम्पोमुळे शेड तुटू शकते, याचा विचार ती बांधण्याची परवानगी देताना केला नाही. पालिकेच्या अधिकाऱ्यांचे नाट्यगृहातील मूलभूत गरजांकडेही लक्ष नसल्याचा त्रास प्रेक्षकांसह आम्हालाही भोगावा लागत आहे. - दिलीप जाधव, निर्माते.

पुस्तकांच्या स्टॉलसाठी उभारलेल्या शेडचा पत्रा कापून, खांब दोन फूट आत घेण्यात येतील. पत्राही कापायला सांगितला आहे. त्यानंतर नाटकांच्या मोठ्या गाड्या तसेच बसच्या वाहतुकीस कोणताही अडथळा येणार नाही. - संदीप वैशंपायन, समन्वयक, नाट्यगृहे आणि जलतरण तलाव.

त्याच कंत्राटदाराकडून काम

यासंदर्भात डेप्युटी चीफ इंजिनियर संजीवकुमार पांडव ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले की, स्वच्छतागृहातील गळती शोधण्यासाठी पाइप आणि प्लास्टर तोडण्यात आले; पण कॉन्ट्रॅक्टरने वेळेत काम पूर्ण न केल्याचा त्रास प्रेक्षकांना सहन करावा लागत आहे. लवकरच स्वच्छतागृहाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होईल. दीड वर्षांपूर्वी ज्या कॉन्ट्रॅक्टरने काम केले त्याच्याकडून आता अतिरिक्त पैसे न देता काम केले जाईल, असेही पांडव म्हणाले.

दुर्घटनेला आमंत्रण...

नाट्यगृहातील पहिल्या मजल्यावरील काही खिडक्यांची तावदाने तुटली आहेत. निकृष्ट दर्जाच्या ॲल्युमिनियमची फ्रेम्स वापरल्याने त्यातून काचा निखळल्या आहेत. अचानक एखादी काच बाहेर पडून दुर्घटना घडली तर दुखापत होण्याची भीती प्रेक्षकांसोबतच नाट्यगृहातील कर्मचाऱ्यांना आहे.

 

टॅग्स :नाटक