मुंबई : कुर्ला पश्चिमेकडील मेहताब इमारतीला शनिवारी रात्री लागलेली आग विझविताना केवळ दाटीवाटीचे रस्ते आणि अनधिकृत पार्किंगचा अडथळा आल्याचे चित्र होते. आगीची घटना घडली तेव्हा एल वॉर्ड परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत पार्किंग होते. हे पार्किंग धोकादायक ठरले. कारण ते नसते तर अग्निशमन दलास आग विझविण्यास अडथळे आले नसते. सुदैवाने या आगीत मनुष्यहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे.आगीत इलेक्ट्रिक साहित्य, कागदपत्रे, लाकूड, एलपीजी शेगडी, दारे, खिडक्या, सिलिंग फॅन, बेड मटेरियल आदी साहित्य जळून खाक झाले. ही इमारत रहिवासी असून, संपूर्ण आगीदरम्यान होत असलेल्या सिलिंडर स्फोटामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.मुख्य रस्त्यापासून दुर्घटनाग्रस्त इमारत आत असल्याने तसेच दाटीवाटीच्या रस्त्यांमुळे आग विझविण्यात अनेक अडथळे येत होते. शुक्रवारी रात्री १० वाजता लागलेली आग मध्यरात्री दीडच्या सुमारास नियंत्रणात आली. या दुर्घटनेमुळे कुर्ला रेल्वे स्थानकाकडे जात आलेल्या मुख्य रस्त्यावरील दोन्ही दिशेकडील वाहतूक सुमारे तीन तास बंद ठेवण्यात आली होती.
दाटीवाटीच्या रस्त्यांमुळे आग विझविण्यात अडथळे; अनधिकृत पार्किंग ठरले धोकादायक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 11:49 PM