Join us  

बहुजन समाजातील विद्यार्थ्यांची फेलोशीप बंद, छगन भुजबळांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 6:16 PM

फेलोशिपसाठी पात्र ठरलेले विद्यार्थी हे ग्रामीण आणि मूलभूत सुविधा उपलब्ध नसलेल्या भागातील असून ते प्रचंड कष्ट करुन पीएचडी शिक्षणापर्यंत पोहोचले आहेत

मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) वतीने पीएचडी आणि एमफील करणाऱ्या विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जाते. २०१३ पासून सुरु असलेली फेलोशिप सरकारने थांबविल्यामुळे विद्यार्थी तसेच बहुजन समाजात संतापाचे वातावरण आहे. राज्य सरकारने बार्टी संस्थेद्वारे संशोधनासाठी वितरीत करण्यात येणारी संशोधन फेलोशिप बंद केली आहे. इतर योजनांच्या निधीमध्ये सुद्धा कपात करण्यात आली आहे. या विरोधात संशोधक विद्यार्थी ५० दिवसांपासून आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. मात्र शासनाने याबद्दल कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे विदयार्थ्यांमध्ये असंतोष पसरला असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार छगन भुजबळ यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना दिली. 

फेलोशिपसाठी पात्र ठरलेले विद्यार्थी हे ग्रामीण आणि मूलभूत सुविधा उपलब्ध नसलेल्या भागातील असून ते प्रचंड कष्ट करुन पीएचडी शिक्षणापर्यंत पोहोचले आहेत. यातील बहुतेक विद्यार्थ्यांची घरातील पहिली शिक्षण घेणारी पिढी आहे. भूमीहीन, शेतमजूर, कष्टकरी, वीटभट्टी, घरकाम करणाऱ्यांची ही मुले आज आपली गुणवत्ता सिद्ध करत आहेत. पण जर फेलोशिपच बंद झाली तरी या मुलांच्या भवितव्याचं काय होणार हा मोठाच प्रश्न आहे. त्यामुळे, बार्टीच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणारी पीएचडी फेलोशिप योजना पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी भुजबळ यांनी विनंती पत्राद्वारे मुख्यमंत्री शिंदेंकडे केलीय. 

दरम्यान, राज्यात बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांमार्फत मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाकडून मदत केली जाते. त्यांना वसतिगृह, विविध भत्ते आणि पीएचडी करण्यासाठी आर्थिक मदत करण्यात येते. त्यामुळे, ग्रामीण भागातील किंवा गरीब कुटुंबातील विद्यार्थीही उच्चशिक्षित होण्याचे स्वप्न पाहतो, उच्च शिक्षित होऊन कुटुंबाचा मोठा आधार बनतो. मात्र, आता बार्टी कडून मिळणारी ही फेलोशीपच बंद केल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. 

टॅग्स :मुंबईछगन भुजबळविद्यार्थीएकनाथ शिंदे