Join us

बार्टी, सारथी, महाज्योतीच्या परदेशी शिष्यवृत्तीचे नियम शिथिल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 8:25 AM

पदवी, पदव्युत्तर पदवी परीक्षेत ५५ टक्के गुण मिळविणारे विद्यार्थी पात्र

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : बार्टी, टीआरटीआय, सारथी आणि महाज्योती यांसारख्या संस्थांकडून देण्यात येणाऱ्या परदेशी शिक्षणासाठीच्याशिष्यवृत्तीसाठी गुणांची अट राज्य सरकारने शिथिल केली आहे. 

आता परदेशातील विद्यापीठात पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अथवा पीएचडीच्या शिक्षणासाठीशिष्यवृत्ती मिळविण्यास अनुक्रमे पदवी आणि पदव्युत्तर पदवी परीक्षेत ५५ टक्के गुण मिळविलेले विद्यार्थी पात्र ठरणार आहेत. तसेच खर्चाची मर्यादा हटविण्यात आली असून, परदेशातील विद्यापीठाची सर्व फी राज्य सरकार भरणार आहे.

परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणाऱ्या राज्य सरकारच्या या संस्थांनी जून महिन्यात मागविलेल्या जाहिरातीमध्ये ७५ टक्के गुणांची अट घातली होती. 

विद्यार्थ्यांपुढे अनेक अडचणी 

त्यातून परदेशातील शिक्षणाचे स्वप्न बाळगून असलेल्या अनेक विद्यार्थ्यांची निराशा झाली होती. तसेच ही अट शिथिल करण्याची मागणी केली जात होती. मात्र, आता राज्य सरकारने पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका आणि पीएचडीचे शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून अनुक्रमे पदवी आणि पदव्युत्तर पदवी परीक्षेत किमान ५५ टक्के गुण मिळविण्याची अट घातली आहे. तसेच आता विद्यार्थ्यांचे सर्व शैक्षणिक शुल्क संबंधित संस्थांकडून थेट परदेशातील विद्यापीठाच्या खात्यात जमा केले जाणार आहे. त्यातून विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यापीठांतील शिक्षणाचे संपूर्ण शुल्क मिळणार आहे. परदेशातील महागाई पाहता निर्वाह भत्ता खर्चाची मर्यादा वाढवून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी युकेतील विद्यापीठात शिकणाऱ्या सौरभ हटकर या विद्यार्थ्याने केली.

पीएचडी फिलोशिपची संख्या वाढवली

दरम्यान, बार्टी, सारथी आणि महाज्योती या संस्थांकडून देशातील विद्यापीठांमध्ये पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या फिलोशिप संख्या वाढविली आहे. या फिलोशिपसाठी एकूण विद्यार्थ्यांची संख्या २०० वरून ३०० एवढी करण्यात आली आहे, तर टीआरटीआयकडून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या फिलोशिपसाठी विद्यार्थी संख्या १०० वरून २०० करण्यात आली आहे.

देशातील शिक्षण संस्थांमध्ये पीएचडीचे शिक्षण घेणाऱ्यांना दिलासा

दरम्यान, अनुसूचित जाती, ओबीसी, भटके विमुक्त, एसबीसी आणि मराठा समाजातील पीएचडीच्या सरसकट सर्व विद्यार्थ्यांना फिलोशिप द्यावी, या मागणीसाठी आंदोलन केले होते.  आता या विद्यार्थ्यांची मागणी सरकारने मान्य केली असून, ऑक्टोबर २०२३ पूर्वी पीएचडीच्या फिलोशिपसाठी अर्ज केलेल्या सर्व ३,५४५ पैकी पात्र विद्यार्थ्यांना सरसकट ५० टक्के फिलोशिप देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, सर्व पात्र विद्यार्थ्यांना फिलोशिप देण्याच्या निर्णयाचे स्वागत आहे. मात्र, सर्व विद्यार्थ्यांना १०० टक्के फिलोशिप द्यावी, अशी मागणी विद्यार्थी संदीप आखाडे यांनी केली आहे.

 

टॅग्स :शिक्षणशिष्यवृत्ती