मुंबई : कल्याण-डोंबिवलीतील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी बारवी धरणाची उंची वाढविण्याचे काम येत्या दोन महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली. कल्याण-डोंबिवली भागातील पाण्याची वाढती गरज भागविण्यासाठी तातडीची उपाययोजना म्हणून बारवी धरणाची उंची वाढवावी, अशी मागणी काँग्रेसचे संजय दत्त यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून केली. यावर उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सदर धरणाचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. धरणामुळे विस्थापित होणाऱ्या गावांना उत्कृष्ट पॅकेज देण्यात आले असून, बहुतांश लोकांनी ते स्वीकारले आहे. मात्र, एका गावाने व एका पाड्याने विस्थापित होण्यास नकार दिल्याने पुढील काम रखडले आहे. सदर गावातील लोकांशी चर्चा सुरू असून, लवकरच बारवी धरणाचे काम पूर्णत्वास जाईल, असे देसाई यांनी सांगितले. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून हेच उत्तर मिळत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीच या प्रश्नाचे उत्तर द्यावे, अशी मागणी संजय दत्त यांच्यासह विरोधी सदस्यांनी लावून धरली. त्यावर, उद्योग मंत्र्यांनी दिलेले उत्तर सुस्पष्ट असून त्याची तंतोतंत अंमलबजावणी केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. बारवी धरणाचे काम जवळपास पूर्ण झाले असून, केवळ दोन महिन्यांचे काम शिल्लक आहे. २५ घरांच्या पुनर्वसनाचा प्रश्न असून उत्तम पॅकेज देत हा प्रश्न सोडविला जाईल आणि धरणाचे काम दोन महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच आॅगस्ट महिनाअखेरीस या कामाची आढावा बैठक घेतली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
बारवी धरणाचे काम दोन महिन्यांत पूर्ण करणार
By admin | Published: July 24, 2015 1:41 AM