मुंबईत 'बसंत' बहार; विक्रोळी परिसरातील 'बसंत रानी'च्या वृक्षांना बहर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2018 02:38 PM2018-03-09T14:38:43+5:302018-03-09T14:38:43+5:30
सुमारे २५ ते ३० फुट उंच असणा-या ह्या झाडांना दरवर्षी साधारणपणे वसंत ऋतूत बहर येतो.
मुंबई: बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील पूर्व द्रुतगती मार्गावरील छेडा नगर ते विक्रोळी या भागात व विशेष करुन मार्गाच्या मध्यभागी असणा-या दुभाजकावर पर्यावरणाच्या व सुशोभिकरणाच्या दृष्टीकोनातून विविध झाडे लावण्यात आली आहेत. या झाडांमध्ये 'बसंत रानी' या प्रकारच्या झाडांचाही समावेश आहे. सुमारे २५ ते ३० फुट उंच असणा-या ह्या झाडांना दरवर्षी साधारणपणे वसंत ऋतूत बहर येतो. यावर्षी देखील फुलांनी बहरलेली'बसंत रानी' ची झाडे नागरिकांचे व पुष्पप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहेत. या झाडांना पाणी देणे व वेळोवेळी आवश्यक ते परिरक्षण करण्याची कामे महापालिकेच्याच उद्यान खात्याद्वारे नियमितपणे केली जात असतात, अशी माहिती उद्यान अधीक्षक श्री. जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे.
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील पर्यावरणाचे संवर्धन होण्यासोबतच सुशोभिकरणही साधले जावे, या दृष्टीने महापालिकेच्या उद्यान खात्याद्वारे वृक्षारोपण व वृक्ष जोपासना नियमितपणे केली जात असते. महापालिका क्षेत्रात नुकत्याच झालेल्या वृक्षगणनेनुसार महापालिका क्षेत्रात २९ लाख ७५ हजार २८३ एवढे वृक्ष आहेत. यामध्येच ६ हजार ५८० 'बसंत रानी' वृक्षांचाही समावेश आहे.हिंदी भाषेत 'बसंत रानी' अशी ओळख असणा-या या झाडाचे वनस्पतीय शास्त्रीय नाव 'टॅब्यूबिया पेंटाफायला' (Tabebuia Pentaphylla / Tabebuia Rosea)असे आहे. तर याच झाडाला इंग्रजीमध्ये'पिंक ट्रंम्पेट, पिंक पाऊल, पिंक टिकोमा'या नावांनीही ओळखले जाते, अशीही माहिती श्री. परदेशी यांनी दिली आहे.