९० बासरी कलाकारांसोबत साजरा होणार 'बासरी उत्सव', पं. हरिप्रसाद चौरसियांचे बासरी वादन
By संजय घावरे | Published: January 11, 2024 03:30 PM2024-01-11T15:30:31+5:302024-01-11T15:30:41+5:30
विवेक सोनार सादर करणार प्रभू श्रीरामचंद्राच्या संगीत धुनी
मुंबई - ९० बासरीवादकांच्या तालबद्ध बासरी वादनाने १५ वा 'बासरी उत्सव' साजरा होणार आहे. यामध्ये पं. हरिप्रसाद चौरसीया आणि विवेक सोनार यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे औचित्य साधत वाजवलेली प्रभू श्रीरामचंद्राच्या संगीत धुनी रसिकांचे लक्ष वेधणार आहे.
२० आणि २१ जानेवारी रोजी ठाणे येथील डॉ काशिनाथ घाणेकर ऑडीटोरियममध्ये यंदाचा बासुरी उत्सव साजरा होणार आहे. बासरीवादक विवेक सोनार यांनी स्थापन केलेल्या 'गुरुकुल प्रतिष्ठान' या धर्मादायी संस्थेने या महोत्सवाचे आयोजन केले आहे. भारतीय शास्त्रीय संगीताचा त्यातही बासरी व इतर संगीत प्रकारांचा प्रसार आणि प्रसार करणे व त्याला लोकप्रियता मिळवून देणे, या हेतूने दरवर्षी हे आयोजन केले जाते. त्या माध्यामतून भारतातील उच्च संगीत वारशाची जपणूक केली जाते. दोन दिवसांच्या या महोत्सवात 'फ्लूट सिम्फनी' या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमात ८ ते ८० वर्षे वयोगटातील ९० बासरीवादक प्रभू श्रीरामाशी संबंधित भक्तीधुनी सादर करणार आहेत. २२ जानेवारीला अयोध्या येथे होत असलेल्या श्रीराम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर हे अनोखे सादरीकरण होणार आहे. या महोत्सवात बासरीवादनातील विविध शास्त्रीय प्रकार सादर होणार आहेत.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी प्रशांत बनिया आणि रवी जोशी यांच्यात बासरीवादनाची जुगलबंदी रंगणार आहे. त्यानंतर मंजुषा पाटील यांच्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम होईल. पहिल्या दिवसाची सांगता बासरीवादक पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरासिया यांच्या वादनाने होणार आहे. त्यांना पं. योगेश सामसी तबल्यावर साथ देणार आहेत.
बासरी उत्सवच्या दुसऱ्या दिवशी २१ जानेवारीला 'फ्लूट सिम्फनी'नंतर कर्नाटकी बासरी वादन सत्र सदर होणार असून ते शशांक सुब्रमण्यम सादर करतील. त्यानंतर या महोत्सवात एका ज्येष्ठ शास्त्रीय संगीत कलाकाराला 'पं. हरिप्रसाद चौरसिया जीवनगौरव पुरस्कारा'ने गौरविण्यात येणार आहे. पं. स्वपन चौधरी यांच्या एकल तबला वादनाने या महोत्सावाची सांगता होईल.