बुडत्याला खुल्या प्रभागाचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2016 05:27 AM2016-10-12T05:27:12+5:302016-10-12T05:27:12+5:30
सर्वच स्तरातील घटकांना जनतेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्यासाठी आलेले आरक्षण मात्र नगरसेवकांना हद्दपार करणारे ठरले आहे. पाच वर्षांपूर्वी ७७ खुल्या प्रभागांतून निवडून आलेल्या
मुंबई : सर्वच स्तरातील घटकांना जनतेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्यासाठी आलेले आरक्षण मात्र नगरसेवकांना हद्दपार करणारे ठरले आहे. पाच वर्षांपूर्वी ७७ खुल्या प्रभागांतून निवडून आलेल्या ५० ते ६० नगरसेवकांचे प्रभाग यंदा आरक्षणात गेले आहेत. त्यामुळे आपली राजकीय कारकिर्द वाचविण्यासाठी विद्यमान नगरसेवकांपुढे केवळ खुल्या प्रभागांचा मार्ग उरला आहे. परिणामी, खुल्या प्रभागांसाठी दावेदार अधिक असल्याने सर्वच राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच आणि अंतर्गत गटबाजी वाढली आहे.
२०१२मध्ये ५० टक्के महिला आरक्षणाने अनेक दिग्गजांना धक्का दिला. निम्मे प्रभाग आरक्षित झाल्याने अनेकांना घरी बसावे लागले. २०१७च्या निवडणुकीतही हे चित्र बदललेले नाही. राजकीय पक्षांचे पालिकेतील गटनेतेही या आरक्षणाच्या तडाख्यातून सुटलेले नाहीत. निम्म्या नगरसेवकांचा हक्काचा प्रभाग आरक्षणामुळे त्यांच्या हातून गेला आहे. या नगरसेवकांनी आसपासच्या खुल्या प्रभागांकडे मोर्चा वळविला आहे. (प्रतिनिधी)
काही खुले प्रभाग-
या वेळी ७५ प्रभाग खुले आहेत. पाच वर्षांपूर्वी आरक्षित निम्म्यांहून अधिक प्रभाग या वेळी खुले झाले आहेत. मात्र आरक्षित प्रभागांमध्ये असलेले ताकदवान नगरसेवकच बाद झाले आहेत. त्यामुळे आसपासच्या खुल्या प्रभागांत त्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
दहिसर येथील प्रभाग क्रमांक २, ३ आणि ८ खुले झाले आहेत. मात्र शिवसेनेचे नेते विनोद घोसाळकर यांचे पुत्र व नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचा प्रभाग क्र. १ आरक्षित झाला आहे. त्यामुळे खुल्या प्रभागावर त्यांचा दावा असणार आहे. मात्र तेथे शिवसेनेच्या विद्यमान नगरसेवकाबरोबरच त्यांना उमेदवारीसाठी लढत द्यावी लागेल.
समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांचा प्रभाग आरक्षित झाल्याने तीन-चार प्रभाग सोडून खुल्या झालेल्या प्रभागात त्यांचा दावा असणार आहे.
माहीमचे आमदार सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर हा १९४ क्रमांक प्रभागातून इच्छुक आहे. तर याच प्रभागात नगरसेविका किशोरी पेडणेकर आणि शिवसेनेचेच वरळीतील आमदार सुनील शिंदे यांचा भाऊ निशिकांत शिंदे इच्छुक असल्याचे समजते.
मनसेमध्ये गटनेते संदीप देशपांडेही आरक्षणाच्या जाळ्यात अडकले आहेत. त्यांच्या आसपासचे प्रभागही आरक्षित झाल्यामुळे त्यांना थेट प्रभाग क्र. १८२मध्ये दावा टाकावा लागणार आहे. मात्र तेथे आधीच मनसेच्या नगरसेविका श्रद्धा पाटील आहेत. असे चित्र बऱ्याच प्रभागांत असल्याने उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच पक्षांतर्गतच सुरू झाली आहे.