भूजल पातळी वाढवण्यासाठी खड्ड्यांचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:09 AM2021-08-25T04:09:33+5:302021-08-25T04:09:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई - जागतिक दर्जाच्या मुंबई शहरात विकासकामं झपाट्याने होत आहेत; पण यामुळे तयार झालेल्या काँक्रीटच्या जंगलात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - जागतिक दर्जाच्या मुंबई शहरात विकासकामं झपाट्याने होत आहेत; पण यामुळे तयार झालेल्या काँक्रीटच्या जंगलात पावसाचे पाणी जिरवण्याची जागाही उरलेली नाही. परिणामी, उष्णता वाढत असून भूजल स्तराची पातळी खालावली आहे. वेळीच हा दुष्परिणाम रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने आपल्या ३२५ उद्यानांमध्ये खड्डे खणून पावसाचे पाणी जिरवण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प देशभर यशस्वी करणारे राज्याच्या पर्यावरण आणि वातावरण बदल विभागाच्या माझी वसुंधरा अभियानाचे राजदूत सुभजित मुखर्जी यांच्याशी केलेली ही बातचीत...
* मुंबईतील भूजल स्तराची पातळी वाढवण्यासाठी सुरू केलेल्या कार्याबद्दल काय सांगाल?
- काँक्रिटीकरणामुळे मुंबई शहर उष्णतेचे बेट झाले आहे. आज तळमजल्यावरील घरातही थंडावा जाणवत नाही. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्याची नितांत गरज आहे. यासाठी तीन फूट बाय तीन फूट रुंद व सहा फूट खोल खड्डा खणून पावसाचे पाणी त्यात जिरवण्याचा हा प्रयोग आहे. राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी हा प्रकल्प मुंबईत राबवण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार पालिकेच्या ७५ उद्यानांमध्ये असे खड्डे खाणण्यात आले असून, महिनाभरात ३२५ उद्यानांत हा प्रयोग केला जाणार आहे.
* रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी यापूर्वीचे महापालिकेने केलेले प्रयत्न फोल ठरले आहेत? मग या प्रयोगाचे भवितव्य काय?
- सरकारने हेल्मेट वापरणेही सक्तीचे केले; पण लोक ऐकत नाहीत. असे अनेक नियम पाळले जात नाहीत, म्हणून आपण प्रयत्न सोडायचे का? या निष्काळजीपणाचे परिणाम आता आपण भोगत आहोत; पण लोक आता जागृत होऊ लागले आहेत. पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्याच्या या प्रयोगासाठी प्रत्येक खड्ड्याकरिता पाच हजार रुपये खर्च येतो. बोरिवली, दहिसर येथील काही सोसायट्यांनी आपल्या आवारात, असे प्रयोग राबवण्यास सुरुवात केली आहे.
* पण पावसाचा कल पाहता, या प्रयोगाच्या यशाची खात्री आहे का?
- जमिनीत पाणी जिरवण्यासाठी पावसावरच अवलंबून राहण्याची गरज नाही. कपडे, भांडी, लादी आदी घरातील कामांसाठी वापरण्यात आलेले पाणीही अशा खड्ड्यांमध्ये ओतल्यास ते जमिनीत मुरते. राज्यात औरंगाबाद, पुणे, नाशिक, नागपूर येथे हा प्रकल्प राबविण्यात आला आहे. तसेच दिल्ली, सुरत, अहमदाबाद, उत्तर प्रदेश, पटना, चेन्नई, तामिळनाडू येथेही अशा प्रयोगाला यश मिळाले आहे. मुंबईत मात्र अद्याप प्रयत्न सुरू आहेत.
* हा उपक्रम नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कोणते प्रयत्न सुरू आहेत?
- पाण्याची गरज भागवण्यासाठी मुंबई शहर आत्मनिर्भर होणे अपेक्षित आहे. एखाद्यावेळी पाणीबाणी परिस्थिती निर्माण झाल्यास पिण्याचे पाणी सहज उपलब्ध होण्यासाठी पवई तलावासारखे स्तोत्र साफ करून घेणे आवश्यक आहे. तसेच समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पही चांगला आहे. घराच्या आवारात खड्डा खणून पाणी जमिनीत जिरवण्यासाठी वेळ, पैसा, तंत्रज्ञान खर्च होत नाही. आज पाणी वाचवल्यास उद्या जीवन सुकर होईल.