धरणांनी गाठला तळ

By admin | Published: June 24, 2017 12:38 AM2017-06-24T00:38:28+5:302017-06-24T00:38:28+5:30

जून महिनाअखेर उजाडला तरी पावसाने जिल्ह्यात म्हणावा तसा जोर पकडलेला नाही. जिल्ह्यात ८० टक्के भात पेरण्या पूर्ण झाल्या असल्या तरी त्यापैकी ६० टक्केपेक्षा

The base reached by the dams | धरणांनी गाठला तळ

धरणांनी गाठला तळ

Next

विशेष प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : जून महिनाअखेर उजाडला तरी पावसाने जिल्ह्यात म्हणावा तसा जोर पकडलेला नाही. जिल्ह्यात ८० टक्के भात पेरण्या पूर्ण झाल्या असल्या तरी त्यापैकी ६० टक्केपेक्षा अधिक पेरण्या पावसाअभावी करपू लागल्या आहेत. ४० टक्के पेरण्या उपलब्ध नद्या आणि विहिरींच्या पाण्यावर तरू शकल्या आहेत. येत्या दोन दिवसांत आर्द्रा नक्षत्राचा पाऊस चांगला होईल असा आशावाद प्रयोगशील शेतकरी महेश्वर देशमुख यांनी व्यक्त केला आहे.
शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या ४८ तासांत जिल्ह्यात एकूण ४०९.४६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हे पर्जन्यमान सरासरी २५.५९ मिमी आहे. गतवर्षी हे पर्जन्यमान ११०.३० मिमी होते
जिल्ह्यातील २८ लघुपाटबंधारे प्रकल्प (छोटी धरणे) क्षेत्रात अपेक्षित पाऊस झाला नसल्याने धरणांतील पाणी पातळी तळ गाठू लागली आहे. २८ धरणांची एकूण जलसाठा क्षमता ६८.२६१ दलघमी असून, शुक्रवारी त्यामधील प्रत्यक्ष उपलब्ध जलसाठा केवळ १७.४७६ दलघमी आहे. दरम्यान, १ जून २०१७ पासून सुरू झालेल्या पावसात या २८ धरण प्रकल्प क्षेत्रात एकूण ७६७८ मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती रायगड पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.
वीजनिर्मितीकरिता महत्त्वपूर्ण असलेल्या भिरा धरण क्षेत्रात देखील पर्जन्यमानात घट झाली आहे. शुक्रवारी सकाळी संपलेल्या ४८ तासांत केवळ २० मिमी पावसाची नोंद धरण क्षेत्रात झाली. तर १ जून २०१७ पासून केवळ ४५५.६० मिमी पावसाची नोंद येथे झाली आहे. भिरा धरणाची एकूण संकल्पित जलसाठवण क्षमता ९.०९० दलघमी आहे तर सद्यस्थितीत येथे उपयुक्त शिल्लक जलसाठा ४.७५५ दलघमी आहे.

जिल्ह्यात कुंडलिका, अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास आणि गाढी अशा सहा प्रमुख नद्या आहेत. परंतु या सर्व नद्यांच्या पाण्यातही अद्याप कोणतीही वाढ झालेली नाही.
१ जूनपासून कुंडलिका नदी क्षेत्रात एकूण २७३ मिमी, अंबा नदी क्षेत्रात एकूण ३२४ मिमी, सावित्री ३१५ मिमी, पाताळगंगा ७१ मिमी,उल्हास नदी १२४ मिमी आणि गाढी नदी क्षेत्रात १७२ मिमी पावसाची नोंद झाली असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.

शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या ४८ तासांत जिल्ह्यात सर्वाधिक ६६ मिमी पावसाची नोंद गिरिस्थान माथेरान येथे झाली आहे. उर्वरित ठिकाणी तळा-५९, पनवेल-५८.४०,पेण-४०.१०,उरण-३७, खालापूर-२८, रोहा-२७, सुधागड-१८.६६, अलिबाग-१८, कर्जत-१४.७०,पोलादपूर-१३, म्हसळा-१०, माणगाव-०८, महाड-०५, मुरुड व श्रीवर्धन येथे ०३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Web Title: The base reached by the dams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.