Join us

अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारावर विद्यार्थी जाणार दहावी - बारावीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 4:06 AM

मुंबई : इयत्ता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला; मात्र या वर्गोन्नतीसाठी जाहीर केलेल्या ...

मुंबई : इयत्ता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला; मात्र या वर्गोन्नतीसाठी जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये या इयत्तांमधील विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुणांकन देण्याचा निर्णय घ्यावा. असे करताना या सर्व विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देण्याचे बंधन शाळांवर असणार आहे, असे निर्देश शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी दिले आहेत. त्यामुळे राज्यातील इयत्ता नववी आणि अकरावीच्या जवळपास ३० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना वर्गोन्नती मिळणार आहे.

इयत्ता नववी व अकरावीमधील विद्यार्थ्यांचे शाळेने आयोजित केलेल्या चाचण्या, प्रात्यक्षिके, अंतर्गत मूल्यमापनातील किंवा विद्यार्थ्यांना विषयनिहाय चाचण्या, ट्युटोरिअल घरी सोडविण्यास देऊन किंवा कोणत्याही सोयीच्या मूल्यमापन तंत्राचा वापर करून त्याआधारे विद्यार्थ्यांना गुणांकन देण्याचा निर्णय शाळा व कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर घेण्यात यावा, असे सांगण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर वेगळ्या सत्र नोंदी न करता मूल्यमापन साधनांमधील विषयनिहाय प्राप्त गुणांचा उल्लेख करून प्रचलित पद्धतीने गुणपत्रक तयार करावे, असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

शिक्षण हक्क कायद्यानुसार इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना नापास करता येत नाही, तर नववीचे विद्यार्थी नापास होत असल्यास त्यांची परीक्षा पुन्हा घेण्यात येते. परंतु बहुतांश शाळा दहावीचा शाळेचा निकाल चांगला लागावा, यासाठी अभ्यासक्रमात मागे असलेल्या विद्यार्थ्यांना नापासचा शेरा देतात. तसेच अकरावीतदेखील नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तुलनेने जास्त आहे.

गुणांकनावर प्रश्नचिन्ह

अकरावीची प्रवेश प्रक्रिया यंदा उशिरा सुरू झाल्याने अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश उशिरा झाले आहेत. अनेक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये या उशिरा प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झालेला नाही. अशा विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन पूर्ण झाले नसताना त्यांना वर्गोन्नती देताना गुणांकन कसे द्यायचे, असा प्रश्न शिक्षक व शिक्षण संस्थांपुढे उभा राहिला आहे.

चौकट

राज्यातील एकूण विद्यार्थीसंख्या

नववी - १७९७६५५

अकरावी - १३२२३८६

एकूण - ३१२००४१