ठाणे : बांगलादेशात बॉम्बस्फोटाद्वारे स्वत:च्या पत्नीची हत्या करून दहशत माजविणाऱ्या फरारी बशिर मुल्ला शुकुर मुल्ला शेख (४०) याला ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभाग-१ने पकडल्यानंतर त्याची चौकशी शनिवारी पोलीस आयुक्तांसह दहशतवादविरोधी पथक (एटीएस) विभागाने सुरू केली आहे. तसेच त्यांच्या संदर्भातील असलेल्या गुन्ह्यांबाबत बांगलादेशातील पोलिसांकडून खातरजमा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.नवी मुंबईत बस्तान बसविलेल्या बशिर मुल्ला शेख याला ठाणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने घरफोडीच्या गुन्ह्यात संशयित म्हणून शुक्रवारी कळव्यातून अटक केली. याचदरम्यान, चौकशीत त्याला मार्चमध्ये मुंबई सीआयडीने बांगलादेशातून विना पासपोर्ट भारतात प्रवेश केल्याप्रकरणी अटक केली होती. याच गुन्ह्यात तो जामिनावर बाहेर आला होता. तसेच त्याने बांगलादेशामध्ये दहशतवादी संघटनांकडून बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण घेत, घरीच बॉम्ब तयार केले आणि तेथील नराईल जिल्ह्यात स्फोट केल्याची कबुली दिली. ८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत असलेल्या बशिर मुल्ला याची कसून चौकशी करण्यात आली. यामध्ये दहशतवादविरोधी पथकासह पोलीस आयुक्त, सह-पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी केली आहे. दरम्यान, त्याच्या साथीदारांसह मुंबईतील जागा आणि कळव्यातील घरफोडीचा तसेच तो कोणत्या दहशतवादी संघटनेशी संलग्न आहे, भारतामध्ये बेकायदेशीर वास्तव्यामागे त्याचा देशविघातक हेतू आहे काय? याचा तपास सुरू आहे. लवकरच यातून काहीतरी मोठे समोर येण्याची शक्यता ठाणे पोलिसांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)
बशिर मुल्लाची एटीएसमार्फत चौकशी सुरू
By admin | Published: November 06, 2016 2:03 AM