कलरफुल गणवेशापेक्षा मूलभूत सुविधा दिल्या तरी बस्स झाले; सफाई कामगारांचा नवीन गणवेश चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 04:02 PM2023-05-16T16:02:49+5:302023-05-16T16:03:15+5:30
पालिका प्रशासनाने सफाई कामगारांसाठी चौक्या, आवश्यक तिथे शौचालय, इतर सुविधा याबाबत तजवीज करावी, अशी मागणी ते करीत आहेत.
मुंबई : सफाई कामगारांचे अनेक प्रश्न असून, पालिका प्रशासनाकडून त्यांच्या मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष केले जाते. एकीकडे मुंबईची स्वच्छता राखण्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या सफाई कामगारांना अधिकाधिक सुविधा देणे गरजेचे असताना दुसरीकडे प्रशासन त्यांच्या कलरफुल गणवेशावर खर्च करत आहे. मात्र, याला सफाई कामगार व कामगार संघटनांनी विरोध केला आहे. पालिका प्रशासनाने सफाई कामगारांसाठी चौक्या, आवश्यक तिथे शौचालय, इतर सुविधा याबाबत तजवीज करावी, अशी मागणी ते करीत आहेत.
चकाचक व सुंदर मुंबईसाठी रात्रंदिवस स्वच्छतेची जबाबदारी पार पाडणारे सफाई कामगारांना पालिका नवीन लूक देणार असून, वर्षानुवर्षे खाकी गणवेश बदलून आता कलरफुल गणवेश देण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेच्या ‘ए’ वॉर्डात प्रायोगिक तत्त्वावर येथील सफाई कामगारांना नवीन गणवेश देण्यात आला असून, लवकरच पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील २७ हजार सफाई कामगारांना नवीन गणवेश देण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्याने दिली.
मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात २७ हजार सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र त्यांना दिल्या जाणाऱ्या अपुऱ्या सुविधा, घरांचा प्रश्न याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, कलरफुल गणवेश देण्यात येत आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागातील वरिष्ठ अधिकारी यांच्या दालनात याच विषयावर नुकतीच बैठक झाली. बैठकीत सर्वच कामगार संघटनांनी विरोध केला. कामगार अनेक सुविधांपासून वंचित आहेत. कामगारांना चौक्या नाहीत, शौचालयांची संख्या अपुरी आहे. महिला कामगारांना कपडे बदलण्याकरिता वेगळी खोली, लाइट, पाणी अशा अनेक गोष्टी आहेत. याबाबत सुधारणा करावी, अशी सूचना अध्यक्ष बाबा कदम आणि चिटणीस रामचंद्र लिंबारे यांनी केली आहे, तर म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव यांनीही या नव्या गणवेशाला विरोध केला आहे. त्यामुळे नवीन गणवेश देण्याबाबत चर्चेत निर्णय झाला असून, नवीन गणवेशाबाबत सफाई कामगारांच्या संघटनांकडून हरकती, सूचना मागविल्या आहेत. त्या प्राप्त झाल्यानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.
दररोज ६ हजार मेट्रिक टन कचरा होतो गोळा
- मुंबई शहर व दोन्ही उपनगरांतून अगदी गल्लीबोळातील कचरा गोळा करण्याचे काम सफाई कामगार करतात.
- मुंबईतून दररोज ६ हजार मेट्रिक टन कचरा गोळा होतो.
- स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी सफाई कामगार झटत असतात; मात्र त्याचा गणवेश वर्षानुवर्षे खाकी आहे.
- त्यामुळे नवीन गणवेश देण्याबाबत निर्णय झाला असून, लवकरच पालिकेच्या २४ वॉर्डातील सफाई कामगारांना गणवेश वाटप करण्यात येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.