मुंबई : चेन्नई पूरग्रस्तांना सर्व स्तरांतून मदत होत असताना लालबाग येथील गुरुकुल स्कूल आॅफ आर्टच्या विद्यार्थ्यांनीही पुढाकार घेतला आहे. आपल्या कलेच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांनी हा पुढाकार घेऊन जनसामान्यांनाही यात सामील करून घेतले आहे. गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी चेन्नई पुराच्या आपत्तीवर चित्रे रेखाटून मुंबईकरांना निधीसाठी आवाहन केले. शिवाय, या चिमुरड्यांनी खाऊचे पैसेही निधीसाठी देऊन समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण केला. मुंबईकरांना केलेल्या या आवाहनाच्या माध्यमातून ११ हजार ५९२ रुपये चिमुरड्यांनी एकत्र केले. हा निधी तामिळनाडू मुख्यमंत्री जनसाहाय्यता निधीला पाठविण्यात येणार असून त्याद्वारे पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यात येणार आहे.या उपक्रमात हर्षदा चिंदरकर, वैदेही सावंत, तनिषा जाधव, सानिका वेंगुर्लेकर, रौनक तावडे, अदिती दातेकर, अथर्व टुकरुक, मृण्मयी पाताडे, सिद्धी शिंदे, श्रेया सावंत, दूर्वांका सुरती, सुहानी मोहिते, रश्मीत नारकर आणि सृष्टी कुलकर्णी यांनी सहभाग घेतला. या उपक्रमाविषयी गुरुकुलचे मुख्याध्यापक सागर कांबळी यांनी सांगितले की, या माध्यमातून चिमुरड्यांवर आतापासूनच समाजात घडणाऱ्या गोष्टींबद्दल संवेदनशील राहण्याचे संस्कार होत आहेत. शिवाय, कलेच्या आधारे पूरग्रस्तांना मदत हेसुद्धा समाजाप्रती कृतज्ञतेचे लक्षण असल्याने अशा प्रकारे उपक्रम राबविताना कृतज्ञ भावना मनात असते. (प्रतिनिधी)
पूरग्रस्तांसाठी कलेचा आधार
By admin | Published: December 08, 2015 1:03 AM