राजकीय प्रभावासाठी घेतला ‘दिवाळी पहाट’चा आधार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 05:47 AM2018-11-07T05:47:19+5:302018-11-07T05:47:39+5:30

कुटुंबीय, मित्र परिवारासह घरी साजरी करण्यात येणारी दिवाळी पहाट आता मुंबईतील गल्लोगल्ली साजरी होऊ लागली आहे.

The basis of the 'Diwali Pahat' taken for political influence | राजकीय प्रभावासाठी घेतला ‘दिवाळी पहाट’चा आधार

राजकीय प्रभावासाठी घेतला ‘दिवाळी पहाट’चा आधार

Next

- अजय परचुरे
मुंबई - कुटुंबीय, मित्र परिवारासह घरी साजरी करण्यात येणारी दिवाळी पहाट आता मुंबईतील गल्लोगल्ली साजरी होऊ लागली आहे. त्यातच २०१९ च्या निवडणुकांपूर्वीची ही शेवटची दिवाळी असल्याने राजकीय नेत्यांनीही ‘दिवाळी पहाट’ला प्रचारासाठी आपलेसे करून घेतले आहे. दिग्गज नेत्यांनी आयोजित केलेले विनामूल्य सूरमयी दिवाळी पहाट गल्लोगल्ली सुरू असल्याचे चित्र आहे.
‘दिवाळी पहाट’चे स्वागत सुरांच्या मैफलीने करण्याची पद्धत गेल्या २५ ते ३० वर्षांपासून रूढ झाली आहे. मुंबई, पुणे, ठाणे, विलेपार्ले, डोंबिवली अशा शहरांपुरत्याच या मैफल मर्यादित न राहता खेड्यांतही आयोजित केल्या जात आहेत.
दिवाळीत होणाऱ्या या पहाट कार्यक्रमांच्या गर्दीला पाहून मुंबईत राजकीय नेत्यांनी पुरस्कृत केलेल्या अनेक विनामूल्य पहाट लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. यात आघाडीवर आहेत भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार. त्यांनी रंगशारदा सभागृहात दिवाळी पहाटचा कार्यक्रम विनामूल्य आयोजित केला आहे. यात ज्येष्ठ गायिका उत्तरा केळकर, उपेंद्र भट यांचा सूरमयी समावेश आहे, तर दुसरीकडे शिवसेनेची नेतेमंडळीही मागे नाहीत. शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी दहिसर भागात विनामूल्य कार्यक्रम आयोजित केला आहे. तर रवींद्र नाट्यमंदिरात सरकारच्या सांस्कृतिक खात्यामार्फतच गगन सदन तेजोमय हा दिवाळी पहाटचा कार्यक्रम रंगणार असून यात जितेंद्र जोशी, स्पृहा जोशी, अतुल परचुरे अशा दिग्गज कलाकार आहेत. सांस्कृतिक खात्याने जरी हा कार्यक्रम आयोजित केला असला तरी यामागे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांचा वरदहस्त आहे. शिवसेना नगरसेवक यशोधर फणसे यांनीही अंधेरीत विनामूल्य ‘दिवाळी पहाट’चे आयोजन केले आहे.

मतदारसंघावर पकड कायम ठेवण्याचा प्रयत्न

दिवाळी पहाट कार्यक्रम इव्हेंट झाला आहे. हा इव्हेंट कॅश करण्यासाठी राजकीय पक्षाचे नेते सरसावले आहेत. एका कार्यक्रमासाठी लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. या कार्यक्रमांना प्रेक्षकांचाही भरभरून प्रतिसाद मिळतो. दिवाळी आनंद, उत्साहाचा सण आहे. परस्पर संवाद आणि एकत्र येणे हा त्याच्यामागचा उद्देश असतो. निवडणुकीपूर्वी मतदारसंघावरील प्रभाव कायम राखण्यासाठी नेत्यांनी दिवाळी पहाटचा आधार घेऊन मतांचा फराळ पारड्यात पडावा यासाठी खटाटोप चालविल्याचे पाहायला मिळत आहे.

Web Title: The basis of the 'Diwali Pahat' taken for political influence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.