- मनीषा म्हात्रे मुंबई : अनेकांची नशिबे घडविणारी मुंबई तिला पटली नाही. तिने मुंबई सोडून आपल्या आईकडे परतण्याचा निर्णय घेतला. यामागे कारणही तसेच होते. अवघी १५ वर्षांची ‘ती’. तिला अभ्यासाची खूप आवड होती. मात्र, डोक्यावरील वडिलांचे छत्र हरपले आणि नशीबही फिरले. सख्ख्या काकांनी तिला मुंबईत आणून कामाला जुंपले. मात्र, तिने न घाबरता शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला व घर गाठण्यासाठी काकांच्या तावडीतून पळ काढला. ही कहाणी आहे, गुजरातच्या नवसारी भागात राहाणाऱ्या तेजल अनिल नायका या मुलीची.आई आणि भावासोबत राहत असलेली तेजल तेथील एका शाळेत आठवीत शिकत होती. घरची परिस्थिती हलाखीची असली, तरी तेजलला शिक्षणासाठी काहीही कमी पडू नये, याची काळजी तिचे वडील घेत होते. मात्र, वर्षभरापूर्वीच त्यांचे निधन झाल्यानंतर आईच्या खांद्यावर दोन मुलांचा भार आला. दरम्यान, ५ महिन्यांपूर्वी तेजलचे काका विनोद हे घरी आले. शिकून काय होणार, असे म्हणत तेजलला मुंबईमध्ये चांगल्या ठिकाणी काम मिळवून देतो, असे आमिष दाखवून तिला मुंबईत घेऊन आले. ताडदेव परिसरात ती काकांसोबत राहू लागली. काकाने येथील केक बनविण्याच्या दुकानात तिला नोकरीला ठेवले. तेजलला महिना ६ हजार पगार मिळू लागला. हे पैसे तेजलच्या आईला पाठविण्याऐवजी काकाच काढून घेऊ लागला. पण शाळेत जाणाºया अन्य मुलांना रोज बघून तिची शिक्षण घेण्याची ओढ आणखीनच वाढत होती. काका मला शिकायचे आहे, मला शाळेत पाठवा ना, असे तिने अनेकदा काकांना सांगितले. मात्र, काकाने याकडे दुर्लक्ष केले.शिक्षणाचा ध्यास लागलेल्या तेजलने येथून पळून जाण्याचा निर्णय घेतला. घरी आईकडे जाऊन शिक्षण पूर्ण करायचे, असा निश्चय झाल्यानंतर नुकतीच ती कुणाला काहीही न सांगता काकांच्या घरातून बाहेर पडली. तेजल बेपत्ता झाल्याने काकांनी तिचा शोध सुरू केला. कुठेच थांगपत्ता न लागल्याने त्यांनी ताडदेव पोलीस ठाणे गाठून तेजल हरविल्याची तक्रार दिली.>रवानगी बालसुधारगृहातदुसºया राज्यातून आलेली अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याने, याची गांभीर्याने दखल घेत ताडदेव पोलिसांनी तिचा शोध सुरू केला. गुजरातला आईकडे जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांना ती मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात सापडली. पोलिसांनी धीर देत तिच्याकडे केलेल्या चौकशीत उपरोल्लेखीत धक्कादायक कहाणी समोर आली. त्यानंतर पोलिसांनी अखेर तिला ताब्यात घेत, डोंगरीतील बालसुधारगृहात पाठवून तिची माहिती तिच्या आईला कळविली.
शिक्षणाच्या ध्यासापायी ‘तिने’ धरला गावचा रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 2:33 AM