Join us  

कोरोनाच्या संकटात पीएफचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 7:12 PM

१ लाख ३४ हजार कर्मचा-यांना मिळाले २७९ कोटी

मुंबई - लॉकडाऊनमुळे कोसळलेल्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी भविष्य निर्वाह निधीच्या खात्यांमधून काही रक्कम काढण्याची मुभा केंद्र सरकारने दिली आहे. त्यानुसार गेल्या दहा दिवसांत तब्बल १ लाख ३४ हजार कर्मचा-यांचे अर्ज मंजूर झाले असून त्यांच्या खात्यात जवळपास २७९ कोटी ६५ लाख रुपये जमा झाले आहेत. 

भविष्य निर्वाह निधीचे सदस्य असलेल्या कर्मचा-यांना आपले तीन महिन्यांचे मुळ वेतन आणि महागाई भत्याच्या एकत्रित रकमेच्या ७५ टक्के रक्कम म्हणजे जवळपास दीड महिन्यांच्या वेतनाएवढी रक्कम खात्यातून काढण्याची मुभा देणारा आदेश केंद्रिय कामगार मंत्रालयाने जारी केला आहे. त्यासाठी पीएफ कार्यालयत प्रत्यक्ष येण्याची गरज नसून त्यासाठी या विभागाच्या आयएसडी विंगने सॉफ्टवेअर विकसीत केले आहे. वेबसाईटवर असलेल्या लिंकवर अर्ज केल्यानंतर तीन दिवसांच्या आत बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. या विभागातील अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या दहा दिवसांत देशभरातील १ लाख ३४ हजार कर्मचा-यांनी आॅनलाईन पध्दतीने केलेले अर्ज मंजूर झाले आहेत. त्या कर्मचा-यांच्या खात्यात सरासरी २० हजार रुपयांप्रमाणे २७९ कोटी ६५ लाख रुपये जमा झाले आहेत. 

ही रक्कम कर्मचा-यांच्या पीएफ खात्यामध्ये जमा झालेल्या निधीतूनच दिला जात असली तरी कोरोनामुळे कोसळलेल्या आर्थिक संकटात ती मोलाची ठरत आहे. अनेक कर्मचा-यांची पीएफ कार्यालयाकडील केवायसी अपूर्ण असल्याने त्यांना या योजनेसाठी अर्ज करता येत नव्हते. त्यात आवश्यक असलेले बदल करण्यासाठी केंद्र सरकारच्या आदेशानुसार अटी शिथिल करण्यात आल्या होत्या. प्रत्येक अस्थापनेला त्याबाबत अवगत करून आपल्या कर्मचा-यांची केवायसी अद्ययावत करण्याच्या सुचनाही दिल्या जात होत्या. त्यानुसार केवायसी पूर्ण असलेल्या सदस्यांना या योजनेव्दारे दिले जाणारे पैसे आॅनलाईन अर्ज करून मिळवता येतील असे ठाणे पीएफ कार्यालयातील सह आयुक्त सुधीर घनवीर यांनी सांगितले आहे.  

 

टॅग्स :पैसाकोरोना सकारात्मक बातम्या