Join us  

‘पिठलं-भाकरी स्टॉल’चा आधार

By admin | Published: April 18, 2016 12:44 AM

दुष्काळग्रस्त भागातील दोन महिला कुटुंबकबिल्यासह ठाण्यात आल्या. सामाजिक कार्यकर्त्या कमलताई परदेशी यांनी त्यांना पिठलं-भाकरीचा स्टॉल दिला. एक हक्काचा रोजगार सुरू झाला.

- प्रज्ञा म्हात्रे,  ठाणेदुष्काळग्रस्त भागातील दोन महिला कुटुंबकबिल्यासह ठाण्यात आल्या. सामाजिक कार्यकर्त्या कमलताई परदेशी यांनी त्यांना पिठलं-भाकरीचा स्टॉल दिला. एक हक्काचा रोजगार सुरू झाला. या स्टॉलला पहिल्याच दिवशी ठाणेकर खवय्यांनी उत्तुंग प्रतिसाद दिला असून याच स्टॉलद्वारे त्यांच्या घरातील चूल पेटण्यास मोलाची मदत मिळाली आहे.पिण्यासाठी पाणी नाही, पिकं जळाली, गायीगुरे उपाशी मरत आहेत, शेळ्या-कोंबड्या तर मरून गेल्या, पिण्याच्या पाण्यासाठी रोज १० किमीचा प्रवास करावा लागतो, मुलं हुशार आहेत; पण त्यांच्या शिक्षणाची फीच रखडली आहे. गाडी भाड्यालादेखील एक दमडी नाही, घरातील कर्ताधर्ता असलेल्या पुरुषाच्या हाताला काम नाही... ही व्यथा आहे दौण तालुक्यातील खुटबाव गावाची. दुष्काळाच्या कचाट्यात अडकलेल्या या गावाची ही दारुण कथा. अश्रूही कमी पडतील इतकी दयनीय अवस्था. ही अवस्था पाहून त्याच गावातील दोन कुटुंबीयांना सामाजिक कार्यकर्त्या कमलताई परदेशी यांनी ठाण्यात रोजगार उपलब्ध करून दिला. ही दोन कुटुंबे रविवारी पहाटे ३ वाजता ठाण्यात आली आणि कमलतार्इंनी रविवारी या कुटुंबातील नलिनी गायकवाड व स्वाती चव्हाण यांना पिठलं-भाकरीचा स्टॉल उघडून दिला. महाराष्ट्र व्यापारी पेठ, ठाणे शाखेच्या कार्यवाह चित्रा जठार यांनी गावदेवी मैदान येथे स्टॉलसाठी जागा उपलब्ध करून दिली. त्या महिला आपल्या कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी सकाळी ९ वाजल्यापासूनच काम करीत आहेत. कमलतार्इंनी जेव्हा शहराकडे येण्यास सांगितले, तेव्हा सुरुवातीला धाडसच झाले नाही. काही उमगतच नव्हतं, आम्हाला. त्यांनी खूप समजूत काढली. तेव्हा, आम्ही कसेबसे धीटाईने पहाटे ३ वाजता सामान घेऊन इकडे आलो. इथे येण्यासाठी पैसेही नव्हते. कमलतार्इंनीच आम्हाला वाहतुकीचा खर्च दिला आणि आज त्यांच्यामुळे ठाण्यात आलो, असे दुष्काळग्रस्त भागातून आलेल्या दोन महिला सांगतात. पिठलं-भाकरीचा स्टॉल या महिलांनी सकाळी उघडला आणि ठाणेकर खवय्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिल्याचे त्या आनंदाने सांगतात. चुलीवरच्या ज्वारी आणि बाजरीच्या भाकरी, खमंग पिठलं, मिरचीचा ठेचा, थालीपीठ, भरलेलं वांगं असं गावरान जेवण ठाणेकरांना खायला मिळत आहे. ‘समाजकार्याची मला लहानपणापासून आवड होती. मी स्वत: शेतमजूर आहे. या महिलांना गावात भाजीपाला उपलब्ध करून द्यायचा असेल तर त्यांच्याकडे व्यवस्थाच नाही. त्यामुळे त्यांना शहरात आणले तर त्या स्वत:च्या पायावर उभ्या राहतील, असा विचार करत आज या दोन कुटुंबांना घेऊन आले’, असे कमलताई यांनी सांगितले. ‘लोकमत’नेही केला कमलतार्इंचा गौरव माझ्या कार्याची सर्वप्रथम दखल ‘लोकमत’ वृत्तपत्राने घेतली होती. हे वृत्त आल्यानंतर माझ्या बचत गटाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या उत्पादनांना खूप प्रतिसाद मिळाला. त्यानंतर, ‘लोकमत’ समूहाने माझ्या कार्याची दखल घेत पुरस्कारानेदेखील गौरवले. स्वत: खेड्यापाड्यांतून आलेल्या कमलतार्इंनी माकेर्टिंगची सोपी भाषा या दोन कुटुंबीयांना शिकवली. दुसऱ्याच्या कुबड्यांवर किती दिवस चालणार? स्वत:ची ओळख असावी, या विचारांतून मार्केर्टिंगची संकल्पना सुचली. मला गाडी बंगला नको, पण माझ्या शेतकऱ्याचा माल परदेशात नेण्याची इच्छा कमलतार्इंनी व्यक्त केली.