Join us

राज्यातील ग्रामीण भागात हाॅटस्पाॅट शोधण्यासाठी रॅपिड अँटिजन चाचण्यांचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 4:06 AM

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात हाॅटस्पाॅट शोधण्यासाठी रॅपिड अँटिजन चाचण्या अधिक कऱण्यात येत आहेत. सध्या आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण ४० ...

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात हाॅटस्पाॅट शोधण्यासाठी रॅपिड अँटिजन चाचण्या अधिक कऱण्यात येत आहेत. सध्या आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण ४० टक्के असून, अँटिजन चाचण्यांचे प्रमाण ६० टक्के आहे. ग्रामीण भागात वैद्यकीय प्रयोगशाळांचा विस्तार मर्यादित असल्याने राज्याच्या आरोग्य विभागाने अँटिजन चाचण्यांवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, अमरावती ८४ टक्के, भंडारा ९१ टक्के, गडचिरोली ८७ टक्के आरटीपीसीआरच्या तुलनेत अँटिजन चाचण्या करण्यात येतात. मुंबईत केवळ २० टक्के अँटिजन चाचण्या करण्यात येतात, तर नागपूरमध्ये हे प्रमाण २१ टक्के आहे. पुण्यात रॅपिड अँटिजनच्या तुलनेत आरटीपीसीआर चाचण्या अधिक केल्या जातात, याचे प्रमाण अनुक्रमे ५६ आणि ४४ टक्के आहे.

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या नव्या नियमावलीनुसार, दुसऱ्या लाटेदरम्यान ग्रामीण भागात जास्तीत जास्त कोरोना चाचण्या करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याविषयी राज्याच्या आरोग्य विभागाचे साथ सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले, ग्रामीण भागातील हाॅटस्पाॅटमध्ये संसर्गाची तीव्रता शोधण्यासाठी अँटिजन चाचण्या करण्यात येत आहेत. बऱ्याचदा अँटिजनचा वैद्यकीय अहवाल आरटीपीसीआरच्या तुलनेत लवकर येतो, त्यामुळे गतीने उपचार करता येतात. रुग्णांच्या सहवासातील अतिजोखमीच्या संपर्कांचा शोध घेण्यासही या चाचण्यांची मदत होते. लक्षणे असल्यास अँटिजनमार्फत त्वरित अहवाल मिळतो. मात्र, लक्षणेविरहीत असल्यास आरटीपीसीआर चाचणी करावी लागते.