मुंबई : भात असेल तर जेवणाची गोडी आणखीनच वाढते. अनेकांना वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ आवडतात. प्रत्येकाची तांदळाची आवड ही वेगवेगळी आहे. मुंबईकरांना इंद्रायणी, तुकडा बासमती, कोलम, बासमती, आंबेमोहोर या तांदळांची गोडी असल्याचे दिसून येते. हॉटेलमध्ये तर बासमतीला विशेष पसंती दिली जात असल्याचे दिसून येते.
दररोजच्या आहारात तांदळाचा वापर होत असतो. त्यात मुंबईकरांना इंद्रायणी आणि बासमती तुकडा तांदूळ विशेष आवडतो. हा तांदूळ मस्तपैकी फुलतो आणि शिजल्यावर सुटसुटीत आणि त्याची चव स्वादिष्ट असते. त्यामुळे घरगुती वापरासाठी या तांदळाला अधिक मागणी आहे. बाजारपेठेत मागील वर्षी विविध प्रकारच्या तांदळाचे भाव स्थिर होते. यंदा मात्र जानेवारी महिन्यात नवीन तांदूळ बाजारात आला असून, विविध प्रकारच्या तांदळांच्या दरात १५ ते २० टक्के वाढ झाली आहे.
तांदळाचा वापर हा गरिबांपासून ते श्रीमंतांच्या घरात होत असतो. त्यामुळे धान्य बाजारात तांदळाला मोठी मागणी असते. परंतु, गेल्या वर्षभरात बदलते वातावरण, त्यात अवकाळी पावसामुळे तांदूळ पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामानाने तांदळाच्या मागणीत उलट वाढ होत आहे; मात्र उत्पादन कमी होत असल्याने तांदूळ आणखी वाढण्याची शक्यता बाजारात व्यक्त केली आहे.
तांदूळ आणखी महागणार :
तांदळाची धान्य बाजारात जानेवारी महिन्यात आवक होत असते. गतवर्षी जानेवारी महिन्यात विविध प्रकारच्या तांदळाच्या दरात सुमारे २ किंवा ४ टक्के वाढ झाली होती. दिवाळीनंतर मात्र तांदळाच्या दरात वाढ झाली आहे. विविध प्रकारच्या तांदळात १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
बासमतीचे प्रकार : बाजारात पारंपरिक बासमती तांदळाचे तुकडे दुबार, मिनी दुबार, मोगरा, कणी यांचा सध्या तुटवडा भासत आहे. बासमती तुकडा तांदूळ लोकप्रिय असल्याने त्याला मागणीही असते. ग्राहक आंबेमोहोर, सुगंधी कालीमूछ, लचकारी कोलम, इंद्रायणी,सोनामसुरी यांच्याकडे वळले आहेत.
बासमती -१३० रुपयेआंबेमोहोर -८० रुपयेकोलम -६८ रुपयेचिनोर -४८ रुपये
कर्नाटकचा कोलम तांदूळ खायला अधिक पसंती देत असल्याने कोलम तांदळाला चांगली मागणी असते.