मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. २० नोव्हेंबरला विधानसभेच्या २८८ जागांसाठी निवडणूक होणार आहे. या विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. उमेदवारांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. दरम्यान, मुंबईच्या रस्त्यांवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे बॅनर्स लागले आहेत. या बॅनर्सवर योगी आदित्यनाथ यांच्या फोटोसोबत "बंटेंगे तो कटेंगे" असे स्लोगनही लिहिलेले आहेत. तर या बॅनर्सबाबत भाजप नेते मुख्तार अब्बास नकवी यांनी म्हटले आहे की, ते स्वातंत्र्याच्या वेळी झालेल्या फाळणीशी संबंधित आहेत.
हे बॅनर्स भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुंबईच्या रस्त्यांवर लावल्याचे सांगण्यात येत आहे. विश्वबंधू राय या भाजप कार्यकर्त्याने हे बॅनर्स लावले आहेत. या बॅनर्सचा संबंध महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीशी जोडला जात आहे. या बॅनर्सवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोटोही लावण्यात आला आहे. याशिवाय, "बंटेंगे तो कटेंगे" असे स्लोगनही लिहिलेले आहेत. तसेच, बॅनर्सवर पुढे लिहिले आहे की, "योगी संदेश... एक रहेंगे तो नेक रहेंगे, सुरक्षित रहेंगे".
हे बॅनर्स सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. भाजप नेते मुख्तार अब्बास नकवी यांनीही मुंबईच्या रस्त्यांवर लावलेल्या या बॅनर्सबाबत प्रतिक्रिया दिली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या "बंटेंगे तो कटेंगे" बॅनर्सबाबत विचारलेल्या प्रश्नावर भाजप नेते मुख्तार अब्बास नकवी म्हणाले की, "जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा फाळणी झाली. त्यानंतर लोकांनी फाळणीची भीषणता पाहिली. त्याची पुनरावृत्ती होऊ नये हा ("बंटेंगे तो कटेंगे") यामागचा निष्कर्ष आणि मूळ कल्पना आहे."
दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. मतदानापूर्वी निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या जागावाटपावर चर्चा सुरू आहे. तसेच, आजपासून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. याशिवाय, कार्यकर्तेही पूर्ण ताकदीने प्रचारात व्यस्त आहेत.