Join us  

बत्तीगुलने मुंबई हैराण

By admin | Published: October 17, 2015 2:21 AM

टाटा पॉवरच्या धारावी रिसिव्हिंग स्टेशनवर आलेल्या अतिभारामुळे दक्षिण, मध्य मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरातील रहिवाशांना गुरुवारी मध्यरात्री त्रास सहन करावा लागला.

मुंबई : टाटा पॉवरच्या धारावी रिसिव्हिंग स्टेशनवर आलेल्या अतिभारामुळे दक्षिण, मध्य मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरातील रहिवाशांना गुरुवारी मध्यरात्री त्रास सहन करावा लागला. रात्री बारा वाजता वीज प्रवाहात आलेल्या अडचणींमुळे मुंबईत ठिकठिकाणी वीज प्रवाह खंडित झाल्यानंतर तब्बल तासभर मुंबईकर उकाड्याने हैराण झाले होते.टाटा पॉवरकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री १२:१० वाजण्याच्या सुमारास २२० केव्ही वीज वाहिनीमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाली. या तांत्रिक समस्येचा गुंता वाढत असतानाच धारावी येथील रिसिव्हिंग स्टेशनवर भार आला आणि वीज यंत्रणा ठप्प झाली. परिणामी ऐन रात्री दादर, सायन, गोरेगाव, माटुंगा येथील टाटा पॉवरच्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. मध्यरात्री एक वाजेपर्यंत गेलेली वीज नंतर आली खरी; मात्र तोवर मुंबईकरांचा अक्षरश: घाम निघाला होता.दरम्यान, गिरगाव येथील कोळीवाडीतील ९१ जे या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील मीटर बॉक्समधील कटआऊट जळल्याची घटना घडली. त्यामुळे येथे तब्बल तीन तासांहून अधिक काळ वीज नव्हती. स्थानिकांनी याबाबतची माहिती बेस्टला दिल्यानंतर प्रशासनाचे वीज कर्मचारी रात्री घटनास्थळी दाखल झाले. मीटर बॉक्समधील अडथळा दूर झाल्यानंतर येथील वीज पुरवठा पुन्हा पूर्ववत झाला, अशी माहिती स्थानिकांनी दिली. (प्रतिनिधी)