प्रवाशांच्या दिमतीला बॅटरीवरील कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 05:30 AM2018-04-03T05:30:05+5:302018-04-03T05:30:05+5:30
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये ज्येष्ठ प्रवाशांसह महिला प्रवाशांना दिलासा देणारा उपक्रम मध्य रेल्वेने हाती घेतला आहे. मेल-एक्स्प्रेसमधून येणाऱ्या प्रवाशांसह सामान वाहण्यासाठी बॅटरीवर चालणारी कार सोमवारपासून सुरू करण्यात आली आहे.
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये ज्येष्ठ प्रवाशांसह महिला प्रवाशांना दिलासा देणारा उपक्रम मध्य रेल्वेने हाती घेतला आहे. मेल-एक्स्प्रेसमधून येणाऱ्या प्रवाशांसह सामान वाहण्यासाठी बॅटरीवर चालणारी कार सोमवारपासून सुरू करण्यात आली आहे. या कारचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना ४० रुपये दर मोजावा लागणार आहे.
सीएसएमटी स्थानकात शंभरपेक्षा जास्त मेल-एक्स्प्रेसमधून लाखो प्रवासी प्रवास करतात. यात महिला प्रवाशांसह ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांचादेखील सहभाग आहे. बॅटरी आॅपरेटेड कारची मागणी अनेक काळापासून प्रलंबित होती. याबाबत मध्य रेल्वेवर अनेक वेळा चाचणीदेखील पार पडली. अखेर या बॅटरी कारला सोमवारपासून सुरुवात करण्यात आली. या कारला चार्ज करण्यासाठी मध्य रेल्वे सीएसएमटी स्थानकातील वीज उपलब्ध करून देणार आहे. खासगी कंपनीतर्फे ही कार सुविधा सुरू करण्यात आली आहे.
सद्य:स्थितीत केवळ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्रवाशांच्या सुविधेसाठी बॅटरी आॅपरेटेड कार सुरू करण्यात आली आहे. लवकरच या सेवेचा विस्तार करण्यात येणार असून, भविष्यात दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथेदेखील ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस. के. जैन
यांनी दिली.
वजनानुसार घेणार पैसे : पश्चिम रेल्वेवरदेखील लवकरच बॅटरी आॅपरेटेड कार ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे. यासाठी निविदा काढली असून, आठवड्याभरात योग्य व्यक्तीला संबंधित काम देण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर प्रवाशांना वजनानुसार भाडे द्यावे लागणार आहे. सद्य:स्थितीत सूरत स्थानकावर ही सेवा सुरू आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या सूत्रांनी दिली.