Join us

‘ते’ बॅटरीचोर अखेर गजाआड, दिवसभर चालवायचे टॅक्सी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 7:06 AM

दिवसभर टॅक्सी चालवायची आणि रात्री रस्त्याकडेला पार्क केलेल्या वाहनांतील बॅटरी चोरणाऱ्या टोळीचा कुर्ला पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यामध्ये दोघांना अटक केली असून, त्यांनी मुंबईतील दोनशेहून अधिक वाहनांतील बॅटरी महिन्याभरात लंपास केल्याचा संशय पोलिसांना आहे.

- मनीषा म्हात्रेमुंबई  - दिवसभर टॅक्सी चालवायची आणि रात्री रस्त्याकडेला पार्क केलेल्या वाहनांतील बॅटरी चोरणाऱ्या टोळीचा कुर्ला पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यामध्ये दोघांना अटक केली असून, त्यांनी मुंबईतील दोनशेहून अधिक वाहनांतील बॅटरी महिन्याभरात लंपास केल्याचा संशय पोलिसांना आहे. मोहम्मद उस्मान शबीर राठोड (२१), सलमान कसीम खान (२२) अशी अटक आरोपींची नावे आहेत. दोघेही वडाळा येथील रहिवासी आहेत.३१ मार्चला पहाटेच्या सुमारास कुर्ला परिसरात, दोघांच्या संशयास्पद हालचाली पोलिसांनी हेरल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक लालासाहेब शेटे, पोलीस निरीक्षक सदानंद दाते यांच्या मार्गदर्शनाखाली गस्तीवर असलेले पीएसआय सत्यवान पवार, पोलीस अंमलदार इब्राहिम सय्यद, अर्जुन भाबड, दीपक गलफाडे, गणेश काळे, मारुती पाटील यांनी त्यांच्याकडे चौकशी सुरू केली. तेव्हा सलमानने तेथून पळ काढला. त्यामुळे त्यांच्यावरचा संशय आणखीन बळावला. त्यांनी उस्मानला ताब्यात घेतले. त्याच्या टॅक्सीत १७ बॅटरी दिसून आल्या.एवढ्या मोठ्या प्रमाणात बॅटरी नजरेत पडल्यामुळे पोलीसही चक्रावले. उस्मानकडे चौकशी सुरू असतानाच, बॅटरी चोरी गेल्या प्रकरणी तक्रारदारांची रांग पोलीस ठाण्यात लागली. उस्मानला पोलिसी खाक्या दाखविताच, त्याने गुन्ह्यांची कबुली दिली. त्याच्यापाठोपाठ सलमानलाही पोलिसांनी अटक केली. दोघांविरुद्ध काळबादेवी, नेहरूनगर, धारावी, काळाचौकी, भायखळा, सायन, माटुंगा, व्ही. बी. नगर परिसरात गुन्हे दाखल आहेत. कुर्ला पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध पाच गुन्हे दाखल आहेत. मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.नशेसाठी ४ हजारांचीबॅटरी दोनशे रुपयांतही दुकली नशेसाठी गेल्या महिनाभरापासून ही चोरी करत असल्याचे तपासात समोर आले. ४ ते ६ हजार रुपयांची बॅटरी ते अवघ्या २०० ते ४०० रुपयांत विकत होते.अशी करायचे चोरी...: दोघेही दिवसभर टॅक्सीचालक म्हणून काम करायचे. रात्री १ ते ५च्या दरम्यान रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या वाहनाशेजारी टॅक्सी उभी करायचे आणि त्या वाहनातील बॅटरी काढून टॅक्सीत लपवायचे. याच दरम्यान पोलिसांनी पकडताच, ‘साहब, गाडी खराब हुई है...’ असे कारण सांगून टाळत असे. तेही टॅक्सीचालकाच्या कपड्यांमध्येच असल्याने, त्यांच्यावर कुणाला संशय येत नसे.

टॅग्स :मुंबईबातम्या