Join us

कोरोना विरुद्ध मध्य रेल्वेची लढाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 5:16 PM

मध्य रेल्वेकडून देशभरात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा; रेल्वे सेवा बंद असली तरी, मालगाडी सुरु 

 

एक महिन्यात  70 हजार वॅगनमधून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा 

मुंबई : कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर देशातील रेल्वे सेवा बंद केली असली, तरी मालगाडी सुरु आहे. त्यामुळे देशातील कानाकोपऱ्यात जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करून मध्य रेल्वे प्रशासन कोरोनाच्या परिस्थितीत आपले कर्तव्य निभावत आहे. मागील एका महिन्यात मध्य रेल्वेने ७० हजार ३७४ वॅगनमधून जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक केली.

मध्य रेल्वेच्या मुंबई, नागपूर, भुसावळ, सोलापूर आणि पुणे विभागातून दररोज लोडिंग/ अनलोडिंगसाठी विविध टर्मिनसवर सुमारे ७५ रॅक मालगाड्या येतात. यात अन्नधान्य, वीज निर्मितीसाठी कोळसा आणि सिमेंटसारख्या इतर वस्तूंचा समावेश आहे. २४/७  हे काम सुरु असते.  त्यामुळे २३ मार्चपासून ते २२ एप्रिलपर्यंत १ हजार ४१५ मालगाड्यामधून ७० हजार ३७४ वॅगनची वाहतूक करणे मध्य रेल्वेने शक्य केले आहे.  

 

 

 

मध्य  रेल्वेच्या मुंबई, नागपूर, भुसावळ, सोलापूर आणि पुणे विभागात २५२ वॅगनमध्ये धान्य, ४८४ वॅगनमध्ये साखर, ३४ हजार ४९७ वॅगनमध्ये कोळसा, २५ हजार ३८० वॅगन्समध्ये कंटेनर, ५ हजार १८३ वॅगन्समध्ये पेट्रोलियम उत्पादने, १ हजार ८०२ वॅगनमध्ये खते, ६३५ वॅगन्समध्ये स्टील, २५२ वॅगन्समध्ये डि-ऑईल केक आणि ११७ वॅगनमध्ये सिमेंट व १ हजार ७७२ वॅगनमध्ये विविध वस्तू भरल्या गेल्या.

मध्य रेल्वेने सुमारे २२० पार्सल गाड्या वेळापत्रकानुसार चालविल्या जात असून त्यामध्ये औषधे, भाज्या, नाशवंत वस्तू, पोस्टल बॅग या वस्तू देशभरात पाठवल्या आहेत.  मध्य रेल्वेने २१ एप्रिलपर्यंत २ हजार टनाहून अधिक जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक केली होती. ज्यात औषधे, वैद्यकीय उपकरणे, फळे, भाज्या, अंडी, टपाल पिशव्या आणि कच्चा माल समाविष्ट होता. कोरोना विरुद्ध आमची लढाई सुरु आहे, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली. 

टॅग्स :रेल्वेकोरोना सकारात्मक बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्या