Join us

मातोश्रीच्या अंगणात प्रतिष्ठेची लढाई

By admin | Published: January 26, 2017 3:47 AM

एच ईस्ट वॉर्डातील प्रभाग क्रमांक ९३ मधील लढत शिवसेनेच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते. या प्रभागात शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे

मुंबई : एच ईस्ट वॉर्डातील प्रभाग क्रमांक ९३ मधील लढत शिवसेनेच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते. या प्रभागात शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा कलानगर परिसर आणि मातोश्री हे निवासस्थानही येते. त्यामुळे शिवसेनेची ही प्रतिष्ठेची लढाई मानली जाते. या प्रभागात खरी लढत शिवसेना, राष्ट्रवादी यांच्यात होईल. पण भाजपाने वेगळी चूल मांडल्यास, या प्रभागात निवडणूक जिंकण्यासाठी भाजपा संपूर्ण ताकद लावेल. एच ईस्ट वॉर्डमध्ये एकूण अकरा प्रभाग होते आणि प्रभागांची फेररचना झाल्याने ती संख्या दहावर आली आहे. या वॉर्डात सध्याच्या घडीला शिवसेनेच्या चार नगरसेवकांसह काँग्रेसचे तीन, मनसेचे दोन, भाजपा आणि अपक्ष असे प्रत्येकी एक नगरसेवक आहेत. एच ईस्ट वॉर्डात सगळ्यांचे लक्ष आहे ते प्रभाग क्रमांक ९३ वर. हा प्रभाग पूर्वी ८९ प्रभाग म्हणून ओळखला जात होता. २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत ८९ प्रभागातून शिवसेनेचे अनिल त्रिंबककर यांनी ५ हजार ८३८ मते मिळवून विजय प्राप्त केला होता, तर दुसऱ्या क्रमांकासाठी राष्ट्रवादीच्या गणेश मांजरेकर यांना ५ हजार ४२७ मते मिळाली होती. त्यानंतर, तिसऱ्या क्रमांकावर मनसे होती. तर शिवसेनेतून बाहेर पडलेले आणि अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिलेले सुहास पाटील यांना चौथ्या क्रमांकावर होते. सध्या सुहास पाटील हे राष्ट्रवादीत आहेत. त्यामुळे सध्याच्या ९३ नंबर प्रभागात शिवसेना, राष्ट्रवादी असा सामना रंगेल. मात्र, भाजपाने वेगळी चूल मांडल्यास भाजपाकडूनही येथे चांगला उमेदवार उभा केला जाईल. आरपीआयने भाजपासोबत जाण्याचा विचार केल्यास, या प्रभागात भाजपाच्या पाठिंब्यावर आरपीआयचा उमेदवारही उभा करण्याची शक्यता आहे. हा प्रभाग आता महिलांसाठी आरक्षित झाल्याने, उमेदवार निवडीचा मोठा प्रश्न सर्वच पक्षांसमोर आहे. (प्रतिनिधी)