सट्टा किंगचा ‘गेम’; पिता-पुत्राला बेड्या, दिवसाला कोट्यवधीची कमाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 12:54 AM2018-07-05T00:54:34+5:302018-07-05T00:54:41+5:30
गेम किंग इंडिया या कंपनीच्या नावाने देश-विदेशात आॅनलाइन सट्टाबाजाराचे जाळे पसरविलेल्या सट्टा किंग पिता-पुत्राचा सायबर सेलच्या पोलिसांनीच ‘गेम’ करत त्यांना हरियाणाच्या गुरुग्राममधून बेड्या ठोकल्या आहेत.
मुंबई : गेम किंग इंडिया या कंपनीच्या नावाने देश-विदेशात आॅनलाइन सट्टाबाजाराचे जाळे पसरविलेल्या सट्टा किंग पिता-पुत्राचा सायबर सेलच्या पोलिसांनीच ‘गेम’ करत त्यांना हरियाणाच्या गुरुग्राममधून बेड्या ठोकल्या आहेत. रमेश चौरसिया (५४) आणि आचल चौरसिया अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध मुंबईतच गेल्या चार वर्षांत १९ गुन्हे दाखल आहेत. सायबर सेलच्या पोलिसांना त्यांची वेबसाइटही बंद पाडली.
मुंबईचा रहिवासी असलेल्या सट्टा किंग रमेशने येथीलच एका नामांकित महाविद्यालयातून १९७६ मध्ये वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षाचे शिक्षण घेतले. त्यानंतर स्वत: एक छोटी शाळा उघडली आणि मुलांना गेम खेळण्यास शिकविले. गेमच्या वाढत्या मागणीमुळे त्याने सॉफ्टवेअर तयार करून १९९६ मध्ये लिजिंग अॅण्ड फायनान्स कंपनीच्या नावाखाली तो कोट्यधीश झाला. त्यानंतर त्याने आणखी दोन कंपन्या उघडल्या. मुंबईच्या लोअर परळ भागात गेम किंग आॅफ इंडिया नावाचे कार्यालय थाटले आणि येथूनच त्याने देश-विदेशात आॅनलाइन सट्ट्याचे जाळे पेरले. १५हून अधिक देशांत त्याचे जुगाराचे अड्डे सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. त्यात भारतातील १७हून अधिक राज्यांचा समावेश आहे.
१७ फेब्रुवारी रोजी रमेशविरुद्ध जे.जे. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी ९ जणांना अटक केली. सट्टा किंग रमेश आणि त्याचा मुलगा आचल हरियाणात असल्याची माहिती सायबर सेलच्या पोलिसांना मिळाली. सायबर सेलचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने सापळा रचून हरियाणाच्या गुरुग्राम येथून २ जुलैला दोघांना अटक केली. आचल हा सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे. मंगळवारी न्यायालयाने त्यांना ५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
दिवसाला कोट्यवधीची कमाई
सायबर सेलने गेम किंग आॅफ इंडिया या कंपनीच्या ‘गेम किंग आॅफ इंडिया डॉट कॉम’ आणि ‘प्लानेटजीआॅनलाइन डॉट कॉम’ या दोन वेबसाइट बंद करण्यासाठी पाठपुरावा केला आणि केंद्र सरकारच्या मदतीने ही संकेतस्थळे बंद करण्यास त्यांना यश आले. याच वेबसाइटच्या आधारे दिवसाला कोट्यवधींची कमाई सुरू होती. या प्रकरणी त्यांच्याकडे अधिक तपास सुरू असल्याची माहिती सायबर सेलचे पोलीस उपायुक्त पठाण यांनी दिली.