Join us

बावनकुळेंनी पडळकरांना सुनावलं, थेट संस्कारच काढले; अजित पवारांशी बोलणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 7:39 PM

पडळकरांनी अजित पवारांचं नाव घेत, हे लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू असल्याची घणाघाती टीका केली होती

मुंबई - भाजप आमदार गोपीचंद पडळकर आरक्षणाच्या मुद्दयावरुन चांगलेच चर्चेत आहेत. आरक्षणाची मागणी करताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना आपण मानत नसल्याचे म्हटले, तसेच बोचरी टीकाही केली. त्यावरुन, आता पडळकरांना पक्षातील त्यांच्या वरिष्ठांकडून सुनावण्यात येत आहे. पडळकरांनी केलेल्या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व पदाधिकारीही आक्रमक झाले आहेत. त्यानंतर, फडणवीसांनी पडळकरांचे कान टोचले. तर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही संस्कार दाखवत त्यांना सुनावले. 

पडळकरांनी अजित पवारांचं नाव घेत, हे लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू असल्याची घणाघाती टीका केली होती. त्यावरुन, हा वाद रंगला असता राष्ट्रवादीचेही कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. तर, सुप्रिया सुळे यांनीही या वादावर प्रतिक्रिया देताना, यासाठीच भाजपने अजित पवारांना सोबत घेतलं का, असा सवाल केला. तसेच, हा अजित पवारांचा मोठा अपमान असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. त्यावरुन, फडणवीसांनी पडळकरांचं विधान योग्य नसल्याचं म्हटलं. तर, चंद्रशेखर बावनकुळे यांनीही दिलगिरी व्यक्त केली आहे.  

हे संस्कार आणि संस्कृतीला सोडून आहे. भारतीय जनता पार्टी कधीही त्याचं समर्थन करणार नाही. महायुतीत तुमचे मतभेद असतील, पण व्यक्तीगत टीका करुन मनभेद तयार करणं हे शोभणारं नाही. राज्याच्या आणि भाजपच्याही संस्कृतीला शोभणार नाही. त्यामुळे, अजित दादांबद्दल जे काही बोललं गेलं त्याबद्दल मी सुद्धा दिलगिरी व्यक्त करतो, असे म्हणत बावनकुळेंनी पडळकरांच्या विधानावरुन जाहीरपणे माफीच मागितली. 

महाराष्ट्रात कुणीही अशाप्रकराचे विधानं करु नयेत, आपले कितीही मनभेद असतील, वैर असेल, तरीही कुठल्याही नेत्याबद्दल अशी विधानं करू नयेत. सार्वजनिक स्वरुपात कोणाचा अपमान करणं हे आपल्या रक्तात नाही. पक्षीय राजकारणावर टीका होऊ शकते, व्यक्तीगत टीका करणे चुकीचं आहे. अजित पवारांनी मोठ्या मनानं पवारांना माफ करावं, मीही यासंदर्भात अजित पवारांना बोलणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. 

फडणवीसांनी कान टोचले

मला असं वाटतं की, गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य अयोग्य आहे. अशाप्रकारचं वक्तव्य त्यांनी करणं हे चुकीचं आहे, तिन्ही पक्षातील नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि आमदारांनी तिन्ही पक्षातील नेत्यांचा सन्मान ठेवला पाहिजे. अशाप्रकारच्या भाषेचा बिलकुल उपयोग करू नये, असे माझं स्पष्ट मत आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या माध्यमातून फडणवीसांनी पडळकरांचे कान टोचले आहेत.  

टॅग्स :गोपीचंद पडळकरचंद्रशेखर बावनकुळेभाजपाअजित पवार