Join us

बीडीडी चाळ क्रमांक ११ : गजबजाट, गोंधळ, भांडण आणि प्रेम हेच समीकरण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 4:09 AM

मुंबई : बीडीडी या नुसत्या चाळी नाहीत. ही एक संस्कृती आहे. येथे काय नाही? असे विचारण्याची सोय नाही. कारण ...

मुंबई : बीडीडी या नुसत्या चाळी नाहीत. ही एक संस्कृती आहे. येथे काय नाही? असे विचारण्याची सोय नाही. कारण येथे सगळे आहे. गजबजाट आहे, गोंधळ आहे, भांडण आहे, प्रेमदेखील आहे; आणि हेच या चाळीचे समीकरण आहे. कारण हे नसेल तर चाळ कसली? हा प्रश्न आहे. अशाच काहीशा जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे तो विजय दयावंत बांदिवडेकर यांनी.

वरळी बीडीडी चाळ क्रमांक ११, खोली क्रमांक ६० मध्ये मी १९७२ सालापासून राहत आहे, असे विजय दयावंत बांदिवडेकर यांनी सांगितले. ते म्हणाले, वरळीतील टिळक हॉस्पिटल (बीडीडी चाळ क्रमांक ५०) येथे माझा जन्म झाला. चाळ क्रमांक ११ मधील महानगरपालिकेच्या शाळेत चौथीपर्यंत शिक्षण, त्यानंतर मराठा हायस्कूलमध्ये दहावीपर्यंत शिक्षण व नंतर एम. डी. कॉलेजमध्ये शिक्षण झाले. पन्नास वर्षे बीडीडी चाळीत वास्तव्य करीत आहे.

माझे वडील मिलमध्ये कामाला होते. संपामध्ये दोन वर्षे (१९८३ - ८४) संघर्षाची गेली. त्या काळात लहान असूनही जबाबदारीचे ओझे पेलण्याची ताकद आली. सर्वसाधारणपणे आजूबाजूला, शेजारी-पाजारी हीच स्थिती होती. लहानपणीच्या आठवणी सांगायच्या म्हणजे, प्रत्येक बीडीडी चाळीमध्ये गजबजाट, गोंधळ, भांडण हे नित्यनेमाचेच. गिरणी कामगारांचा भरणा जास्त असल्यामुळे खानावळ हा प्रकार जास्त होता.

काही ठिकाणी बैठकीचे गाळे म्हणून एका खोलीत बरीच पुरुष मंडळी राहायची. त्यांची बिऱ्हाडे गावी असायची. रात्री झोपण्यासाठी चाळीच्या शेजारील ओटा असुदे किंवा चाळीची गच्ची किंवा मोकळे मैदान येथे प्रत्येकाची झोपण्याची जागा ठरलेली असायची. चाळीच्या प्रत्येक मजल्यावरील दोन खोल्यांच्या मध्ये जी जागा; ज्याला शेअरी म्हणतात, ती शेअरीदेखील रात्री झोपणाऱ्यांनी फुल्ल असायची, अशा अनेक आठवणी आहेत, असे विजय दयावंत बांदिवडेकर यांनी सांगितले.