लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मागील १५ वर्षांच्या पर्जन्यमानाचा विचार करून कमाल पूरमर्यादेचा अभ्यास केल्यानंतर बांधकामासाठी आवश्यक अशा उंचीच्या प्लिंथचे नियोजन केले आहे. त्यामुळे अतिवृष्टी झाल्यास कॉम्प्लेक्समध्ये पाणी साचणार नाही. या सर्व इमारतींतील एवढ्या मोठ्या काँक्रीटमुळे हीट-आयलँड इफेक्ट होऊ नये म्हणून सर्व इमारतींवर हरित - आच्छादन तयार करण्यासाठी फ्लॉवर बेडचा वापर केलेला असून, त्यामध्ये नाजूक लँडस्केप केलेले असेल. व्यापारी इमारतींच्या पृष्ठभागावर विंडमिल्सची रचना असून, त्याद्वारे तयार होणाऱ्या अधिक ऊर्जेचाही वापर सार्वजनिक भागात केला जाईल. अशा प्रकारे सिम्बायोटिक लँडस्केप तयार झाल्याने निसर्ग आणि मानव यांची मैत्री होऊन एकसंधता झाल्यामुळे मानवाच्या गरजांचा योग्य ताळमेळ वरळी येथील बीडीडी चाळीचा पुनर्विकास करताना साधला जाणार आहे.
सर्व इमारतींचे रेफ्युज एरिया एकसंध जोडल्यामुळे एका अखंड हिरव्या लँडस्केपची निर्मिती होऊन वाहनांचा अजिबात अडथळा नसलेला एक चित्तरंजक उंचीचा पादचारी मार्ग तयार होणार आहे. रहिवाशांना भविष्यात ३४ मजली इमारतीत राहायचे आहे. त्यांना त्यात सुरक्षित वाटावे यासाठी उपाययोजना आहे. प्रथम तर या इमारतींची आरसीसी अतिशय सुरक्षित, भूकंपअवरोधक व वातदाबअवरोधक असे असेल. त्याकरिता सेंट्रल कोअर सिस्टीमचे आरसीसी. डिझाइन बनविलेले आहे. प्रत्येक सदनिकेत जाण्यासाठी उंचावर जावे लागणार असेल तरी रहिवाशांच्या वापरासाठी तीन समक्रमित उद्वाहिका असतील. जेणेकरून उद्वाहनांचे अतिउत्तम नियोजन व व्यवस्थापन होईल. त्याशिवाय एका मोठ्या आकाराच्या उद्वाहनाचा वापर स्ट्रेचर व वजनदार सामानासाठी केला जाईल. या सर्व इमारतींध्ये पारंपरिक पद्धतीच्या केबलचा वापर न करता बसबार पद्धतीने वीज वितरण केल्याने रहिवाशांच्या जीवनाची सुरक्षितता साधली जाणार आहे.
प्रत्येक सदनिकेत अग्निअवरोधासाठी पाण्याच्या कारंजाची सोय केलेली असून, ते छतामध्ये बेमालुमरीत्या बसविलेले असतील. प्रत्येक मजल्यावरून जास्तीत जास्त ३-४ मजले चढून वा उतरून गेल्यावर रेफ्युज एरियातून लगतच्या दुसऱ्या इमारतीत जाण्यासाठी पादचारी मार्गाने जाता येईल. सर्व इमारतींना गोल्ड रेटेड हरितवास्तू नियमांतर्गत मंजुरी मिळालेली आहे. कारण त्या अनुषंगाने लागणाऱ्या सोयीसुविधांचे पूर्वनियोजन आहे. वर्षा जलसंचयासाठी पाण्याच्या टाक्यांची सोय आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या भूखंडावर होणाऱ्या पावसाचे पाणी वाहून न जाता त्याचा सदुपयोग केला जाईल. वापरून अशुद्ध झालेले पाणी वाया जाऊ नये म्हणून त्यांचा निचरा गटारीत होणार नाही तर त्याचे शुद्धीकरण करून ते प्रकल्पातच अन्य कारणांसाठी वापरले जाईल. इमारतींच्या सार्वजनिक भागातील वीज उपकरणे, बगिचांतील लाइट्स यांच्यासाठी सौरऊर्जा निर्मिती करून चालविली जातील. सर्व रस्ते, पेव्हर्स हे सूक्ष्मछिद्रित असल्याने अतिवृष्टी झाल्यास पाणी जमिनीत शोषले जाईल व कोठेही साठून राहणार नाही.
पुनर्वसनाच्या सदनिकेची रचना, घरात सूर्यप्रकाश यावा, हवा खेळती असावी, याचा विचार केला आहे. त्यानुसार, पुनर्वसनाच्या इमारतीच्या एका मजल्यावर प्रत्येकी ५०० चौरस फूट चटईक्षेत्राच्या ८ सदनिका असून, प्रत्येक सदनिकेमध्ये लिव्हिंग रूम, किचन, २ बेडरूम्स व २ टॉयलेट्स अशी अंतर्गत रचना असेल. या सर्व सदनिका २ मीटर रुंदीचा खेळती हवा असलेल्या कॉरिडॉरने एकत्र जोडल्या गेलेल्या असतील. नैसर्गिक प्रकाशयोजनायुक्त, हवेशीर व पॅसेजमध्ये अजिबात क्षेत्रफळ न दवडता सदनिकांचे आराखडे तयार करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक सदनिकेस जास्तीत जास्त उंचीच्या खिडक्या असून, त्या क्लस्टर्सच्या बाहेरच्या बाजूस असतील. त्यामुळे प्रत्येक सदनिकेत जास्तीत जास्त प्रकाश मिळेल व मोकळी हवा खेळू शकते.
- विवेक भोळे, मुख्य वास्तुविशारद आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार, बीडीडी पुनर्विकास प्रकल्प, वरळी