मुंबई : बीडीडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत लोकांना भीती वाटते की, आम्हाला घर मिळणार नाही, आम्ही पात्र ठरणार नाही, करार होणार नाही. पण यापैकी काहीच होणार नाही. कारण आम्ही बीडीडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पाचे काम महिन्याभरात हाती घेणार आहोत. तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होणार असून, प्रकल्पात कोणताही बदल होणार नाही. येथील प्रत्येकाला घराला घर मिळेल. कोणीही घरापासून वंचित राहणार नाही. २०२१ जानेवारीपर्यंत ज्यांचे घर नावावर आहे, ते सगळे पात्र आहेत. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही आणि अफवांना बळी पडू नका, असे आवाहन गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले. ना. म. जोशी मार्ग, बीडीडी चाळीचा पुनर्विकास लवकरात लवकर पूर्ण करून तेथील रहिवाशांना हक्काचे घर मिळवून देण्याचा शासनाचा मानस आहे. या अनुषंगाने जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी सायंकाळी ७ वाजता ना. म. जोशी मार्ग, बीडीडी चाळ येथे भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी ना. म. जोशी मार्ग, बीडीडी चाळ पुनर्विकास समितीचे अध्यक्ष कृष्णकांत नलगे यांच्यासह समितीचे पदाधिकारी आणि रहिवासी उपस्थित होते.