बीडीडी चाळ : कोरोनामुळे गेल्या पाच महिन्यांपासून प्रकल्पाचे काम ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 06:42 PM2020-08-26T18:42:24+5:302020-08-26T18:42:51+5:30
पुनर्विकासाच्या कामाला लवकर सुरुवात करावी.
मुंबई : बीडीडी चाळ पुनर्विकासाच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी, अशी विनंती बीडीडी चाळीतील रहिवाशांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना केली आहे. १०० वर्ष जुन्या झालेल्या या चाळींची सध्या बिकट अवस्था असुन मोठी दुर्घटना होण्यापूर्वी पुनर्विकास होणे गरजेचे आहे. कोरोनाच्या साथीमुळे गेल्या पाच महिन्यांपासून प्रकल्पाचे काम ठप्प झाले असुन आता कामाला गती मिळाली पाहिजे. ना.म.जोशी मार्ग येथील पहिल्या टप्प्यातील २७० रहिवाशांनी संक्रमण शिबिरात स्थलांतर केले असून उर्वरित रहिवाशांचे स्थलांतर करून कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी, असे म्हणणे मांडले जात आहे.
ना.म.जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास समितीचे अध्यक्ष कृष्णकांत नलगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीडीडी चाळ पुनर्विकास हा महाराष्ट्र शासनाचा अती महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून तो लवकर पूर्ण व्हावा. आणि भाडेकरूंचे मोठया घराच स्वप्न साकार व्हावे या हेतूने आम्ही शासनाला सर्वतोपरी सहकार्य करीत आहे. म्हाडा ही गृहनिर्माण प्रकल्प राबविणारी सक्षम यंत्रणा असताना बीडीडी पुनर्विकासच काम ज्या गतीने होणे अपेक्षित होते तसे होताना दिसत नाही. आम्ही म्हाडाला वेळोवेळी निवेदन देऊन त्यावर प्रत्यक्ष भेटून चर्चा केली आहे. परंतु काही मुद्यांवर कार्यवाही न झाल्यामुळे प्रकल्पाला विलंब होत आहे शंभर वर्ष जुन्या झालेल्या या चाळींची सध्याची अवस्था खुप वाईट आहे. कोणतीही मोठी दुर्घटना होण्यापूर्वी या चाळींचा पुनर्विकास होणे अत्यंत गरजेचे आहे. कोरोनाच्या साथीमुळे गेल्या पाच महिन्यांपासून या प्रकल्पाचे काम ठप्प झाले असुन आता कामाला गती मिळाली पाहिजे.
दुसरीकडे सुत्रांच्या म्हणण्यानुसार, नायगाव बीडीडी प्रकल्पातून ‘एल अँड टी’ ने माघार घेतली आहे. मागील तीन वर्षांत याबाबतच्या कामासाठीच्या काहीच हालचाली झालेल्या नाहीत. अशा आशायाचा मुद्दा कंपनीने मांडला आहे. सुत्रांच्या म्हणण्यानुसार, तसे पत्र कंपनीने म्हाडाला दिले आहे. नायगाव येथील कंत्राट एल अँड टी आणि ना.म. जोशी येथील कंत्राट शापुरजी पालनज यांना देण्यात आले आहे. दरम्यान, नायगाव येथील एल अँड टी प्रकरणाबाबत म्हाडाकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून याबाबत काहीच प्रतिसाद देण्यात आला नाही. परिणामी एल अँड टी कंपनीला याबाबत विचारले असता त्यांनी नायगाव येथील एल अँड टी प्रकरणात काहीच बोलण्यास नकार दिला.