Join us

बीडीडी पुनर्विकास : १ जानेवारी २०२१ पर्यंत ज्या भाडेकरूच्या नावावर घर आहे ते सर्व भाडेकरू योजनेसाठी पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 4:07 AM

मुंबई : १ जानेवारी २०२१ पर्यंत ज्या भाडेकरूच्या नावावर घर आहे ते सर्व भाडेकरू बीडीडी पुनर्विकास या योजनेसाठी पात्र ...

मुंबई : १ जानेवारी २०२१ पर्यंत ज्या भाडेकरूच्या नावावर घर आहे ते सर्व भाडेकरू बीडीडी पुनर्विकास या योजनेसाठी पात्र असतील. त्या सर्वांना ५०० चौरस फुटाची कार्पेट सदनिका मालकी हक्काची मिळणार आहे. पुढील दहा वर्ष मेंटेनन्स फ्री असणार असून, येत्या महिन्याभरात कामाला सुरुवात करून पुढील तीन वर्षांत पहिल्या टप्प्यातील रहिवाशांना घरे देण्याचा म्हाडाचा मानस आहे.

ना.म.जोशी मार्ग बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाच्या बांधकामाला सुरूवात करण्यासाठी म्हाडाने पूर्ण ताकदीने उतरण्याची तयारी केली आहे. त्या अनुषंगाने म्हाडाचे मुख्य अधिकारी योगेश म्हसे हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी काम करत आहेत. त्यानुसार गुरुवारी दुपारी १ वाजता ना.म.जोशी मार्ग येथे प्रकल्प स्थळी म्हाडाच्या अधिकाऱ्यांसह, उपजिल्हाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि रहिवाशांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ही माहिती देण्यात आली. या बैठकीत बीडीडी पुनर्विकास समितीचे अध्यक्ष कृष्णकांत नलगे, तानाजी केसरकर, मंगल भोईर, शशी नांदगावकर, अण्णा धुमाळे, राहुल इनरकर उपस्थित होते.

पुढील सर्व आढावा बैठका प्रकल्पाच्या ठिकाणी घेतल्या जातील. तसेच रहिवाशांच्या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कायमस्वरूपी दोन अधिकाऱ्यांची प्रकल्पाच्या ठिकाणी नेमणूक केली आहे. रहिवाशांना कायमस्वरूपी नोंदणीकृत करारनामा येत्या काही दिवसांत देण्यात येईल. रहिवाशांची पात्रता जलदगतीने होण्यासाठी पात्रतेचे सर्व अधिकार बीडीडी संचालकांना देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, असे बैठकीत नमूद करण्यात आले.