मुंबई : ना.म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळीतील रहिवाशांना येत्या अडीच वर्षांमध्ये घरांचा ताबा देण्यात येईल, अशी घोषणा म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी शनिवारी केली. डिलाईल रोड येथील ललित कला भवन मैदानावर संक्रमण शिबिरातील रहिवाशांना घरांच्या चाव्यावाटपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी म्हाडाचे सभापती मधू चव्हाण, आमदार सुनील शिंदे आणि म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
म्हाडाच्या माध्यमातून बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रक्रियेला आता सुरुवात झाली आहे. मात्र आपल्याला कायम संक्रमण शिबिरात राहावे लागेल या भीतीने अनेक रहिवाशांंनी पुनर्विकासास विरोध केला आहे. मात्र सामंत यांनी रहिवाशांच्या मनातील भीती दूर करत अवघ्या अडीच वर्षांत तुम्ही तुमच्या हक्काच्या पाचशे चौरस फुटांच्या घरात प्रवेश कराल, अशी ग्वाही दिली. या वेळी २१ रहिवाशांना घरांच्या चाव्या देण्यात आल्या.
ना.म. जोशी मार्गावरील चाळीतील सुमारे ४५१ रहिवाशांना म्हाडाने पात्र ठरवले असून सुमारे दोनशेहून अधिक नागरिकांनी आॅनलाइन करारही केला आहे. सर्व रहिवाशांना दीड किलोमीटरच्या आतील परिसरातील प्रकाश कॉटन मिल, भारत मिल, वेस्टर्न इंडिया मिल या ठिकाणी राखीव असलेल्या संक्रमण शिबिरात जागा देण्यात आली आहे.
भाडेकरूंना या प्रकल्पाबाबत कुठलीही शंका असल्यास त्यांनी म्हाडामध्ये येऊन माहिती घेऊन शंकेचे निरसन करून घ्यावे. संक्रमण शिबिरातील सदनिकेचा ताबा देतेवेळी करारनामा केला जाणार असून त्याकरिता स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी शुल्क म्हाडाच भरणार आहे. तसेच पुनर्वसन सदनिकेचा ताबा देतेवेळी वेगळा करारनामा केला जाणार असून त्या वेळी स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी शुल्क म्हाडामार्फत भरले जाणार आहे. भाडेकरूंनी कुठल्याही भूलथापांना बळी पडू नये. - मधू चव्हाण, म्हाडा, मुंबई मंडळ सभापती