मुंबई : ना.म.जोशी येथील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाच्या कामाने गती पकडावी यासाठी म्हाडाच्या अधिका-यांसोबत बैठक घेतानाच प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी दाखल होत सुरु असलेल्या कामाची पाहणी केली जाईल, असे आश्वासन गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी बीडीडी चाळीतील रहिवाशांना दिली.
बीडीडी चाळीचे काम संथगतीने सुरु असून, या विषयी प्रश्न विचारल्यानंतर म्हाडाचे अधिकारी आणि कंत्राटदार दाद देत नसल्याची तक्रार सातत्याने ना.म.जोशी बीडीडी चाळीतील रहिवाशांकडून केली जात होती. अखेर ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास समितीच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी शासकीय निवासस्थानी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची भेट घेत प्रश्न मांडले.गेल्या चार वर्षांपासून बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प सुरू आहे. प्रत्यक्ष चार वर्षांपूर्वी या कामाची सुरुवात झाली असली तरी अनेक अडचणींमुळे हे काम सुरू होऊ शकले नव्हते. अखेरीस गेल्या वर्षभरापासून या कामाच्या प्रत्यक्ष उभारणीला सुरुवात झाली. त्यासाठी पहिल्या टप्प्यातील दहा इमारती पाडण्यात आल्या.बीडीडी चाळ पुनर्विकास समितीच्या वतीने प्रकल्पाला सहकार्य करण्यात आले. यासाठी रहिवाशांनी स्वत:हून स्थलांतरही केले. मात्र म्हाडा आणि शापूरजी पालनजी यांना सहकार्य करून सुद्धा गेल्या वर्षभरात काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. त्याच वेळी बीडीडी चाळीचा अन्य प्रकल्पांचे काम मात्र जोरात सुरू आहे. याबाबत संबंधित विकासक आणि म्हाडा अधिकारी यांच्याशी वारंवार चर्चा करूनही त्यात फारशी प्रगती झाली नाही, असे अनेक मुद्दे अतुल सावे यांच्या लक्षात आणून दिल्याचे समितीचे अध्यक्ष कृष्णकांत नलगे यांनी सांगितले.अतुल सावे यावर यांनी बैठक घेण्यासह प्रकल्पस्थळची पाहणी करण्याचे आश्वासन दिले आहे. जर कामात कुचराई होत असेल तर संबंधितांना योग्य सूचना देण्यात येतील. प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा, यासाठी शासन रहिवाशांच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही सावे यांनी दिली. दरम्यान, शिष्टमंडळामध्ये तानाजी केसरकर, सुरेश ठमके, दत्ता देसाई, उत्तम बामणे, नंदु मोरे, विजय सावंत, मुरकुटे यांचा समावेश होता.